मोहम्मद घोरीला नपुसंक करणारी राणी नायकी देवी

SV    18-May-2022
Total Views |
 
           राणी नायकी देवी ही इतिहासाच्या पानांवरून गायब झालेली अशी वीरांगना होती, जिने पृथ्वीराज चौहानला विश्वासघाताने पराजित करणाऱ्या मोहम्मद घोरीला नपुसंक केले होते. राणी नायकी देवीचा पराक्रम हे इतिहासातील सुवर्ण पान होते. पण स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या इतिहासकारांनी नायकी देवीचे नावच इतिहासाच्या पुस्तकातून गायब केले.
       जेव्हा राणी नायकी देवीचा इतिहास वाचाल तर अभिमानाने छाती रुंद होईल. आपल्या समाजात अशी एक महान वीरांगना जन्माला आली होती जिने मोहम्मद घोरीला असा धडा शिकवला की भारताकडे वाकड्या नजरेने पहाण्याची त्याची पुन्हा हिंमत झाली नाही.

       राजकुमारी नायकी देवीचा जन्म गोमंतकात झाला होता. तिचे वडील महाराजा शिवचित्ता परमांडी, हे कदंबचे महामंडलेश्वर होते. लहानपणीच युध्द कलेत पारंगत असलेली राजकुमारी नायकी देवी कुशल कूटनीतीज्ञ पण होती. राजकुमारी नायकी देवी मोठी झाल्यावर तिचा विवाह गुजरातचे राजकुमार अजयपाल सिंह यांच्याशी झाला. अजयपाल सिंह गुजरातचे महाराजा महिपाल यांचे सुपुत्र होते.

       सन ११७१ मध्ये अजयपाल सिंह महाराज बनले. त्यांनी चार वर्षे राज्य केले, परंतु ११७५ मध्ये त्यांच्या अंगरक्षकाने त्यांची हत्या केली, महाराज अजयपाल सिंह यांच्या मृत्यूनंतर अन्हिलवाडा ( गुजरात ) राज्याची सूत्रे राणी नायकी देवी यांच्या हाती आली. कारण त्यावेळी त्याची मुले वयाने फार लहान होती. राणी नायकी देवी यांना दोन मुले होती. थोरल्याचे नाव होते मुलराज द्वितीय व धाकट्याचे नाव होते भीमदेव द्वितीय.

     विदेशी आक्रमकांच्या संकटांचे वारे वहात होते. गुजरात राज्यावरही ते घोंगावत होते. अशा वेळी गुजरात राज्याला वाचवण्याची जबाबदारी खंबीर नेतृत्वाकडे असणे आवश्यक होते. राज्यातील वरिष्ठ मंत्री, सामंत, सरदार यांनी एकमताने निर्णय घेतला की, राजनीतीत कुशल असलेल्या राणी नायकी देवी यांच्या हाती राज्य सुरक्षित राहू शकते.

     राज्याचा उत्तराधिकारी असलेला मुलराज द्वितीय जिवंत असताना सिंहासनावर बसणे हे नियमाविरुध्द होईल म्हणून अखेर मुलराज द्वितीय यांना राज्यावर बसवून त्यांच्या प्रतिनिधी म्हणून राणी नायकी देवी यांनी कारभार पहाण्याचे मान्य केले.
        महाराज मुलराज द्वितीय यांच्या राज्याभिषकानंतर काही काळ गुजरात राज्यात शांती व समाधान होते. पण परकीय शत्रू गुजरातवर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची बातमी राणी नायकी देवीच्या गुप्तचरांनी तिच्या कानावर घातली.
         हा परकीय आक्रमक दुसरा तिसरा कोणी नसून पृथ्वीराज चौहान यांनी ज्याला अनेक वेळा अभय देऊन सोडून दिले पण ज्याने विश्वासघाताने पृथ्वीराज चौहान यांना पराभूत करून वध केला तो मोहम्मद घोरी होता.

       मोहम्मद घोरी हा इस्लामिक आक्रमक अत्यंत क्रूर व विश्वासघातकी होता. आपले साम्राज्य वाढवण्याच्या उद्देशाने त्याने ११७८ मध्ये आपल्या विशाल सेनेला गुजरातच्या दिशेने कूच करण्याची आज्ञा दिली. गुजरातची राजधानी अन्हिलवाडाच्या दिशेने सैन्य निघाले. गुजरात जिंकण्याच्या दिशेने कूच करण्याची आज्ञा दिली. गुजरातची राजधानी अन्हिलवाडाच्या दिशेने सैन्य निघाले. गुजरात जिंकण्याच्या उद्देशाने निघालेल्या या सैन्याने अन्हिलवाडा पासून दूर ४० मैलावर असलेल्या अबू पर्वतातील गदारराघट्टा नावाच्या घाटा पाशी तळ ठोकला.

       राणी नायकी देवीला तिचे गुप्तचर मोहम्मद घोरीच्या सैन्याच्या बारीक सारीक हालचालींची माहिती सतत देत होते. त्याप्रमाणे राणी नायकी देवीने सैन्याची उभारणी केली होती व युध्दाच्या व्यूह रचनेची आखणी ती करीत होती.

       मोहम्मद घोरीने राणी नायकी देवीकडे आपल्या दूतातर्फे संदेश पाठवला की, स्वतः राणी, तिची मुले, राज्यातील सर्व  महिला व मुली धनदौलत समवेत माझ्या सुपूर्त करा. नाहीतर राज्यातील सर्वांची कत्तल केली जाईल. राणी नायकी देवीने तो संदेश वाचला आणि त्या दूता करवी उलट संदेश पाठवला की, ''आपल्या अटी आम्हाला मान्य आहेत.''

     राणी नायकी देवी चाणाक्ष व कूटनीतीज्ञ होती. तिला हे माहीत होते की, 'अधर्माला अधर्माने मारणे हाच धर्म असतो.' तिने यापूर्वीच आपले दोनशे योध्दे मोहम्मद घोरीच्या सैन्यात घुसवले होते. ज्या घाटात घोरीचे सैन्य तळ ठोकून होते तेथील जंगलात राणी नायकी देवीचे हजारो सैनिक दबा धरून बसले होते. तिने अगोदरच आपल्या राज्यातील महिला व मुलींना नाडोलचे राजे कल्याण देव चौहान यांच्या राज्यात सुरक्षित पाठवले होते. राणी नायकी देवीच्या २५००० सैन्याने मोहम्मद घोरीच्या सैन्याला अगोदरच घेरलेले होते.

        मोहम्मद घोरीला त्याच्या दूताने राणी नायकी देवीचा आम्हाला आपल्या अटी मान्य आहे, हा निरोप सांगितला आणि घोरीच्या तळावर आनंदाचा जल्लोष सुरु झाला. युध्द न करताच विजय मिळाला होता. मोहम्मद घोरी खूप खुश झाला होता.  त्याला निरोप मिळाला की राणी आपल्या मुलांना घेऊन घोड्यावर स्वार होऊन एकटीच तळाच्या दिशेने येत आहे.

         मोहम्मद घोरी तिच्या स्वागतासाठी घोड्यावर स्वार होऊन तिला सामोरा गेला, पण अचानक राणीचा घोडा काही अंतरावर येऊन एकदम थांबला. मोहम्मद घोरीला समजले नाही की घोडा राणीने  का थांबवला ? पण हाच तर तिचा आपल्या सैनिकांना इशारा होता. क्षणार्धात चहु अंगाने हर हर महादेव च्या गर्जना करत राणी  नायकी देवीचे सैन्य घोरीच्या सैन्यावर तुटून पडले. तेवढ्यात मोहम्मद घोरीने पाहिले की, राणी नायकी देवी मागे हजारो घोडेस्वार येऊ उभे राहिले आहेत. मोहम्मद घोरीच्या  पायाखालची वाळूच सरकली. त्याला काही समजण्याच्या अगोदरच राणी नायकी देवी त्याच्यावर तुटून पडली. मोहम्मद घोरीच्या गुप्तांगवर तिने वार केला. जखमी घोरी कसाबसा तेथून पळून गेला.

      इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार मोहम्मद घोरी इतका घाबरला की आपल्या राज्यात मुलतानला पोहचेपर्यंत तो घोड्यावरून उतरलाच नाही. मोहम्मद घोरीला लक्षात आले की तो नपुसंक झाला आहे. त्यानंतर पुढील १३ वर्षे त्याची भारताकडे डोळे वर करून पहाण्याची हिमंत झाली नाही.