
'ऑपरेशन सिंदूर' द्वारे भारताने नष्ट केलेल्या दहशतवादी तळांची पाकिस्तानने पुन्हा उभारणी सुरू केल्याची माहिती गुप्तचरांनी दिली आहे.
एका वृत्तवाहिनीने गुप्तचरांच्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि हंगामी सरकारच्या मदतीने या प्रशिक्षण केंद्रांची उभारणी सुरू आहे. पाकिस्तानने व्याप्त काश्मीरमध्ये सीमेजवळील जंगलात उच्च तंत्रज्ञान असलेल्या लहान स्वरूपातील केंद्रे सुरू केली आहेत. भारताच्या संभाव्य हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी ही लहान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये मास्क थर्मेल, रडार आणि सॅटेलाइट सिग्नेचरसारखे तंत्रज्ञान आहे.
भारताने सात मे रोजी पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानने लुनी, पुटवाल, टिपू पोस्ट, जमिल पोस्ट, उमरानवाली, छप्रार फॉरवर्ड, छोटा चक, आणि जंगलोरा येथे उद्ध्वस्त झालेल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांची पुन्हा उभारणी सुरू केली आहे. त्याचबरोबर केल, सारडी, धुनियाल, अतमुकाम, जुरा, लिपा, पाचिबन काहुटा, कोटली, खुइरट्टा, मंधार, निकैल, चमनकोट आणि जानकोट येथे नव्याने केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. दुर्गम भाग आणि दाट जंगलामुळे या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. भारतीय गुप्तचरांनी संदेश पकडला असून, त्यानुसार बहावलपुर येथे आयएसआय आणि जैश ए महंमद, लष्करे तैयबा, हिज्बुल मुजाहिदीन आणि रेझिस्टन्स फ्रंट यांच्यात बैठक झाल्याचे पुढे आले आहे.
महाराष्ट्र टाईम्स २९/६/२५