सब लेफ्टनंट आस्था पुनिया या नौदलाच्या 'फायटर स्ट्रीम 'मध्ये (लढाऊ विमान शाखा) दाखल होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. त्यामुळे भारतीय नौदलाच्या इतिहासात शुक्रवारी एक नवा अध्याय लिहिला गेला. विशाखापट्टणम येथील 'आयएनएस देगा' येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात त्यांनी हा मानाचा तुरा रोवला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे नौदलात महिला फायटर पायलटच्या नव्या युगाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नौदलातील महिला फायटर पायलटचा मार्ग मोकळा
'आयएनएस देगा' येथे 'सेकंड बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्स' पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचा पदवी दान समारंभ पार पडला. यावेळी नौदल स्टाफचे सहायक प्रमुख (एअर) रिअर अॅडमिरल जनक बेवली यांच्या हस्ते सब लेफ्टनंट आस्था पुनिया आणि लेफ्टनंट अतुलकुमार धूल यांना प्रतिष्ठेचे 'विंग्ज ऑफ गोल्ड' प्रदान करण्यात आले. हा क्षण नौदलासाठी अत्यंत अभिमानाचा ठरला. सब लेफ्टनंट आस्था पुनिया यांची फायटर स्ट्रीममध्ये निवड नौदलाच्या लैंगिक समानतेप्रति असलेल्या वचनबद्धतेचे आणि 'नारीशक्ती'ला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचे प्रतीक आहे, असे नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या निवडीमुळे सर्व अडथळे दूर सारून समानता आणि संधीची संस्कृती नौदलात रुजवली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. नौदलात यापूर्वी महिला अधिकारी वैमानिक आणि नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून टेहळणी विमाने आणि हेलिकॉप्टर उडवत होत्या. मात्र, लढाऊ विमानांच्या 'कॉम्बॅट स्ट्रीम'मध्ये महिलेचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
याआधी २०१६ मध्ये भारतीय हवाई दलाने अवनी चतुर्वेदी, भावना कंठ आणि मोहना सिंग या तीन महिला अधिकाऱ्यांची पहिली तुकडी 'फायटर स्ट्रीम' मध्ये दाखल करून इतिहास घडवला होता.
पुढारी ५/७/२५