८ जुलै १४९७ रोजी वास्को द गामा यांच्याकडून भारत शोधासाठी युरोपमधून प्रारंभ
आजच्याच तारखेला १४९७ मध्ये वास्को द गामा यांनी युरोप खंडातील पोर्तुगालच्या लिस्बन शहरातून भारताच्या शोधासाठी सागरी मोहिमेस सुरुवात केली. आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपला ओलांडून ते पूर्व आफ्रिकेच्या सागरी किनाऱ्यावर पोहोचले. पुढे एका अरबी नाविकाच्या मदतीने केरळमधील कालिकत (आताचे कोझिकोडे) येथे पोहोचले.
पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत भारत तसेच चीनमधून येणारे मसाले, रेशमी कपडे यांना प्रचंड मागणी होती. रस्ते मार्गाने होणारा हा व्यापार अतिशय खर्चिक तसेच धोकादायक होता. हा व्यापार 'सिल्क रूट'द्वारे होत असे. त्यामुळे युरोपीय देशांनी भारत आणि पूर्वेकडील देशांपर्यंत पोहोचण्यासाठी सागरी मार्गाद्वारे जाणे निश्चित केले. पोर्तुगालचे राजे मॅन्युअल पहिले यांनी सागरी मार्गाने भारताचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. भारतातून काही मसाले आणि अन्य साहित्य घेऊन १४९९ मध्ये जहाज पोर्तुगालला पोहोचले. हे जहाज २० मे १४९८ रोजी कालिकतला पोहोचले होते.
म.टा.८.७.२५.