पंढरीच्या पांडुरंगासमोर आपण गेलो की निर्विचार आणि निर्विकल्प समाधीत आपोआप जातो. खूप काही ठरवून गेलेला माणूस या मूर्तीसमोर जाताच देहभान हरपून निर्विचार होतो. आपण या देवासमोर काही मागावे, ही भावनाच उरत नाही. याचे उत्तर मूर्तीच्या विलक्षण आशा वेगळ्या प्रकारच्या घडणावळीत दडलेले आहे. ही संपूर्ण मूर्ती योगमुद्रेत घडवली आहे. पांडुरंगाच्या चेहऱ्यावर योगी पुस्याचे अष्टसात्विक भाव आहेत, त्यामुळे भक्त निर्विकल्प समाधीतव जातो. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनीदेखील आपल्या अभंगात 'ऐसा हा योगीराजू,' असे म्हटले आहे.
चार प्रकारांत मूर्ती घडविण्याची कला आपल्या देशात दुसऱ्या शतकापासून मूर्तिकला जोपासण्याचे संदर्भ सापडतात, त्या घडविताना प्रामुख्याने चार प्रकारांत मूर्ती घडवलेल्या दिसतात. पहिला प्रकार 'योगमूर्ती', दुसरा प्रकार 'वीरमूर्ती', तिसरा प्रकार 'भोगमूर्ती' आणि चौथा प्रकार म्हणजे 'अभिचारकमूर्ती' आहे.
योगमूर्तीची वैशिष्ट्ये काय ?पांडुरंगाच्या मूर्तीला योगमूर्ती का म्हणावे? ही मूर्ती सरळ, ताठ उभी आहे. पाय ममचरण असून, मान ताठ आहे आणि नजर पायावर स्थिर आहे. डाव्या हातात शंख आणि उजव्या हातात कमळ आहे. हे योगाचे लक्षण सागितले आहे. पांडुरंगाचे वर्णन करताना म्हटले आहे की, 'परखड़ा लिंगम भजे पांडुरंगम्' या मूर्तीकडे पाहून आपल्यातील सात्विक भाव बाहेर येतात.
यात योगमूर्ती ही फार दुर्मिळ मानली आहे. ती पंढरपूरच्या विठ्ठलाची आहे. समचरण पाय असलेली, ताठ मान, हात कटीवर म्हणजे कमरेवर आणि दृष्टी चरणावर आहे. अशा त्या मूर्तीसमोर जाताच आपल्यातील योगप्रवृत्ती जागरूक होते, नकळत आपली योग साधनाच सुरू होते आणि काही मागावेसेच वाटत नाही. चित्त निर्विचार होऊन जाते, अशा मूर्तीला योगमूर्ती म्हटले आहे. तर, भोगमूर्ती म्हणजे ज्या मूर्तीसमोर जाऊन आपल्याला सांसारिक गोष्टी मागाव्या वाटतात. त्या मूर्तीचा हात आशीर्वादाचा म्हणजे अभयमुद्रेत असतो किंवा खाली वरदमुद्रेत म्हणजे दान देणारा असतो. त्या मूर्तीला भोगमूर्ती म्हटले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर तिरुपती बालाजीची मूर्ती ही भोगमूर्ती आहे. त्यामुळे तिच्यासमोर सकाम भावना घेऊन लोक जातात. वीरमूर्ती प्रकारात मारुती आणि महिषासुरमर्दिनी देवी यांचा समावेश होऊ शकतो. या मूर्तीच्या मुद्रेतच वीररस साकारलेला असतो. त्यामुळे आपल्याला शौर्याची उपासना करायची असेल, तर मारुती आणि महिषासुरमर्दिनीची उपासना करतात. व्यायामशाळेमध्ये नेहमी मारुतीची मूर्ती असते, याला वीरमूर्ती म्हटले आहे. अभिचारकमूर्ती म्हणजे तंत्रमंत्राची उपासना करण्यासाठी घडवलेली मूर्ती होय. या मूर्तदिखील दुर्मीळ स्वरूपात आढळतात. गणपती आणि देवीच्या मूर्तीचा समावेश यात असतो.
फक्त पांडुरंगावरच शेकडो अभंग सहाव्या शतकापासून पांडुरंगाच्या मूर्तीचा इतिहास सापडतो. त्या आधीचे फार पुरावे उपलब्ध नाहीत. बाराव्या शतकापासून या मूर्तीबाबत जास्त पुरावे सापडतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यापासून पुढे अनेक संतांनी अभंग रचले. आजवर इतकी अभंगरचना भारतातच नव्हे, तर जगात दुसऱ्या कोणत्याही देवावर रचली गेली नाही हे या मूर्तीचे विशेष आहे.
अठरापगड जातींना एकत्र आणणारा देवपांडुरंग हा सर्वांचा आवडता देव आहे. त्याने अठरापगड जातींना एकत्र आणायचे काम केले आणि तो करतोच आहे. कारण, या देवाला काहीच लागत नाही. गळ्यात तुळशीमाळ आणि कपाळी बुक्का इतकेच सांगितले आहे. त्यामुळेच हा देव सर्वांना भावतो. दरवर्षी जगन्नाथपुरीलादेखील लाखो भाविक जातात. तरी त्या देवावर इतके अभंग रचले गेले नाहीत. पांडुरंग हा देव अत्यंत शांत, स्तब्ध असा उभा आहे. दिव्याची वात वाऱ्यानेही अजिबातही हलणार नाही अशी जी अवस्था असते तीच पांडुरंगाची आहे, असेही वर्णन संतांनी केले आहे.
पुढारी ४/७/२५