हिमनद्यांना पडली चीजसारखी छिद्रे

Vartapatra    04-Jul-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra paryavaran_9.jpg
 
रोन ग्लेशियर (स्वित्झर्लंड): हवामान बदलाचे जगभरात विविध परिणाम होत आहेत. आता स्वित्झर्लंडमधील हिमनद्यांना हवामान बदलामुळे छिद्रे पडली असून त्या स्वीस चीजप्रमाणे छिद्रयुक्त झाल्याचे समोर आले आहे. 'ग्लामोस' या हिमनद्यांवर देखरेख ठेवणाऱ्या गटाचे हिमनदी तज्ज्ञ मॅथिएस हुस यांनी होन हिमनदीचे उदाहरण दिले. स्वित्झर्लंडसह फ्रान्समधून वाहत जाऊन भूमध्य समुद्रात वाहणाऱ्या याच नावाच्या नदीला या हिमनदीमुळे पाणी मिळते.हिमनदी वरील उंच भागांवर बर्फवृष्टीमुळे नवीन बर्फ तयार करत राहते आणि खालील भागांत वितळते. खालील स्तरांवर वितळल्यामुळे गमावलेले बर्फ वरील भागांतील नवीन बर्फामुळे भरून निघते. यामुळे हिमनदी सक्रिय राहते. तापमानवाढीमुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया हिमनदीच्या उंच भागांकडे सरकते आहे, त्यामुळे हिमनदीतील बर्फाचा प्रवाह मंदावतो किंवा पूर्णपणे थांबतो, असे हुस यांनी सांगितले.ही परिस्थिती आपण आपल्या हिमनद्यांवर अधिकाधिक पाहत आहोत. हिमनद्यांतील बर्फ आता पूर्वीसारखा गतिशील राहत नाही. तो फक्त तिथेच स्थिर राहून तिथेच वितळतो. ही गतिशील पुनर्निर्मिती न होण्याची प्रक्रिया हीच बहुधा हिमनद्यांमध्ये छिद्रे निर्माण होण्यामागचे आणि ती टिकून राहण्यामागचे कारण आहे, असेही हुस म्हणाले. ही छिद्रे बहुधा बर्फाच्या तळाशी पाण्याच्या गतीमुळे किंवा बर्फामध्ये तयार होणाऱ्या फटींतून जाणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे निर्माण होत असावीत.
गेल्या महिन्यात आल्प्स पर्वतावरुन आलेल्या चिखलात स्वित्झर्लंडमधील ब्लॅटन गाव पाण्याखाली गेले होते. यामुळे स्वित्झर्लंडच्या हिमनद्यांची बिकट स्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळकपणे समोर आली. पर्वतावरील बर्च हिमनदीने शिखराजवळील खड़काच्या मोठ्या भागाला थोपवून धरले होते. मात्र हिमस्खलन झाल्याने दरीतील गाव गाडले गेले होते. भूगर्भातील बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे ही घटना घडल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटले होते. सुदैवाने, या घटनेपूर्वीच या गावातून बहुतेक नागरिकांना स्थलांतरित केल्याने मोठा अनर्थ टळला होता. दुर्घटनेनंतर एक ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाला होता. गाळामध्ये मानवी मृतदेहाचे अवशेष सापडल्याचे पोलिसांनी सांगितले होते.स्वित्झर्लंड व आल्प्स पर्वतरांगांमध्ये युरोपात सर्वाधिक हिमनद्या आहेत. मात्र, गेल्या १७० वर्षांपासून हिमनद्या हळूहळू कमी होत आहेत. १९८० नंतर ही घट सतत सुरू असून २०२२ व २०२३ हे याबाबत सर्वांत वाईट वर्ष ठरले. गेल्या वर्षी परिस्थिती थोडी सुधारली असली तरी एकूण घसरण ही चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यंदाचे वर्षही हिमनद्यांसाठी चांगले दिसत नाही. गेल्या काही वर्षांत वितळण्याचा वेग स्पष्टपणे वाढला आहे. कमी बर्फ आणि वाढत्या उष्णतेमुळे ही परिस्थिती बिकट होत आहे, असा इशारा झुरिचमधील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने दिला आहे.

२४ पैकी २३ हिमनद्यांनी गमावला बर्फ
युरोपीय युनियनच्या कोपर्निकस हवामान केंद्राच्या मते, यंदाचा मे महिना जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उष्ण महिना होता. अर्थात, जागतिक तापमानवाढ व हवामान बदलाचा केवळ युरोपलाच फटका बसत नसून, सर्व जगावर परिणाम होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संस्थेच्या माहितीनुसार २०२४ मध्ये हिवाळ्यात कमी झालेली बर्फवृष्टी कडाक्याच्या उन्हामुळे गेल्या वर्षी मध्य हिमालय व तियान शान पर्वतरांगेतील २४ पैकी २३ हिमनद्यांनी मोठ्या प्रमाणावर बर्फ गमावला.
सुरुवातीला हिमनदीमधील छिद्रे बर्फाच्या मधोमध तयार होतात आणि हळू हळू त्यांचा आकार वाढत जातो. एक क्षण असा येतो की, या छिद्रांचा वरील भाग कोसळायला लागतो. तेव्हा ही छिद्रे पृष्ठभागावरून दिसू लागतात. काही वर्षांपूर्वी या छिद्रांविषयी फारशी माहिती नव्हती, पण आता ती अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे, हिमनदीची अवस्था स्वीस चीझसारखी सच्छिद्र होत आहे. हिमनदीसाठी ही स्थिती चांगली नाही.
 
- मॅथिएस हुस, हिमनदीतज्ज्ञ
 
सकाळ २६/६/२५