अमरावती : 'मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती...' हे ५८ वर्ष जुनं देशभक्तीपर गीत ऐकताना आपण कल्पनेच्या विश्वात रमून जातो. पण, आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि कर्नूल जिल्ह्यांमध्ये ही कल्पना सत्यात उतरली आहे. या भागातील लोक दरवर्षी पावसाळ्यात अक्षरशः 'हिऱ्यांची कापणी' करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, वज्रकरूर, जोन्नागिरी, तुम्गली आणि मद्दीकेरा यांसारख्या भागांमध्ये लोक सकाळीच घरातली साधी लाकडी अवजारे, चाळणी आणि डाव घेऊन आपलं नशीब आजमावण्यासाठी बाहेर पडतात.
नशिबाने साथ दिली, तर कुणाला १-२ लाखांचा हिरा मिळतो, तर कधी कुणाची ५० लाखांची लॉटरी लागते. एका वृत्तानुसार, प्रत्येक पावसाळ्यात मद्दीकेरा आणि तुम्माली या तालुक्यांमध्ये सुमारे ५ कोटी रुपयांचे हिरे सापडतात. पूर्वी शेतात काम करताना शेतकऱ्यांना कधीतरी एखादा हिन्याचा तुकडा सापडायचा. पण, गेल्या दशकभरात हिरे शोधणे हा एक ट्रेंडच बनला आहे. आता पावसाळा सुरू होताच तेलंगणा, कर्नाटकसह दूरदूरवरून लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी अनंतपूर आणि कर्नूलमध्ये दाखल होतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब पावसाळा संपेपर्यंत इथे तळ ठोकून हिऱ्यांचा शोध घेतात, याच काळात हिऱ्यांचे खरेदीदारही सक्रिय होतात आणि इथे सापडलेला हिरा मुंबई आणि सुरतच्या बाजारपेठेत पोहोचायला वेळ लागत नाही. भारतीय हिरे भूवैज्ञानिक सर्वेक्षणासह अनेक संस्थांनी आंध्र प्रदेशातील हा भाग 'हिऱ्यांचा हॉटस्पॉट' म्हणून घोषित केला आहे. याचा फायदा स्थानिकांना झाला, पण दुसरीकडे शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत. दूरवरून येणारे लोक हिऱ्यांच्या लालसेने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान करत आहेत. नुकतीच पेरणी झालेली पिके त्यांच्या पायाखाली तुडवली जातात. जेव्हा एखाद्याला हिरा सापडतो, तेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी जमिनीत दबलेले हिरे वर येतात आणि सहज दिसू लागतात. हे हिरे काढण्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. मे २०१९ मध्ये जोन्नागिरीत एका मजुराला शेतात काम करताना १४ लाख रुपयांचा हिरा सापडला. त्याच वर्षी पेरावली गावात एका शेतकऱ्याला २ लाख रुपयांचा हिरा मिळाला. केवळ तीन दिवसांत या भागातील लोकांनी १० लाखांचे हिरे शोधले होते. २०२१ मध्ये जोन्नागिरीतील दोन मजुरांनी आपले हिरे अनुक्रमे ७० लाख आणि ५० लाख रुपयांना विकले. कासिम नावाच्या एका ड्रायव्हरला तर आपल्या शेतात तब्बल १.२ कोटी रुपयांचा हिरा सापडला होता. गेल्या वर्षी तुगली आणि मद्दीकेरामध्ये सापडलेल्या चार हिऱ्यांची एकूण किंमत ७० लाख रुपये होती.
पुढारी ३१/७/२५