बुद्धिबळाच्या पटात अवघ्या १९ व्या वर्षी चॅम्पियन अन् ग्रँडमास्टर

Vartapatra    30-Jul-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra mahila_27.jpg
 
भारतीय बुद्धिबळासाठी अभूतपूर्व गौरवाचा दिवस ठरलेला सोमवार, २८ जुलै २०२५, भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. नागपूरच्या केवळ १९ वर्षीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने जागतिक पातळीवर प्रतिष्ठित २०२५ फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. विशेष बाब म्हणजे, तिने अंतिम सामन्यात भारताचीच अनुभवी आणि जागतिक कीर्तीची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिला पराभूत केलं.

दिव्याच्या या यशामुळे ती भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे, तर एकूण ८८ वी जीएम झाली आहे. तिच्या खेळातील संयम, रणनीतीतील अचूकता आणि मानसिक ताकदीचा प्रभाव या अंतिम सामन्यात स्पष्ट दिसून आला. हम्पीसारख्या अनुभवी आणि जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या खेळाडूला पराभूत करणे हे दिव्याच्या कारकीर्दीतील एक मोठं पाऊल मानलं जात आहे.

तसेच नागपूर चेस असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. सोमण यांनी सांगितलं, "ही नागपूरसाठी ऐतिहासिक उपलब्धी आहे. दिव्याने केवळ स्पर्धा जिंकली नाही, तर भारतातल्या एक अत्यंत अनुभवी खेळाडूला नमवत आपली बुद्धिबळातील ताकद दाखवून दिली. ही तिच्या करिअरमधील महत्त्वाची उंची आहे." दिव्या देशमुखचा हा विजय म्हणजे वयाच्या मर्यादा पार करून केवळ कौशल्य, चिकाटी आणि मानसिक समृद्धतेचा विजय आहे. तिचं लवकरच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पटलावर प्रबळ स्थान निर्माण होईल, असा विश्वास बुद्धिबळ क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

तिच्या या विजयामुळे देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. समाजमाध्यमांपासून राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील नेत्यांपर्यंत सर्वांनी दिव्याचं कौतुक केलं आहे. तिचा प्रवास नवोदित बुद्धिबळपटूंना दिशा दाखवणारा आणि प्रेरणादायी ठरणार आहे. हा क्षण भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात नवा अध्याय लिहणारा ठरतोय. दिव्या देशमुखच्या या महान यशाने भारताचा बुद्धिबळ विश्वातील प्रभाव अधिक मजबूत झाला आहे.

महाराष्ट्र टाईम्स २९/७/२५