छतरपूर (मध्यप्रदेश) : येथे ‘उपचार सभे’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू असल्याची माहिती समोर आली आहे. एका राष्ट्रीय हिंदी वृत्तपत्राच्या वार्ताहराने रुग्ण बनून ख्रिस्त्यांकडून चालवल्या जाणार्या कथित ‘उपचार सभे’साठी उपस्थित राहून पुराव्यांनिशी धक्कादायक माहिती समोर आणली. ‘ग्रामीण क्षेत्रातील महिलांचे आरोग्य चांगले रहावे, तसेच त्यांना मानसिक आणि आर्थिक लाभ मिळावा’, या गोंडस कारणांखाली ख्रिस्त्यांकडून ‘उपचार सभे’चे आयोजन केले जाते. प्रत्यक्षात तेथे निष्पाप हिंदूंच्या मनात हे बिंबवले जाते की, ‘केवळ प्रभु येशूच सर्वशक्तीमान आहे. देवतांच्या मूर्ती आणि चित्रे हे सर्व काल्पनिक आहेत.’ यामुळे हळूहळू हिंदू त्यांच्या घरातून देवतांच्या मूर्ती, छायाचित्रे काढून टाकतात, अशी माहिती या वार्ताहराने दिली. हिंदु संघटनांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यातील २०० हून अधिक गावांमधील २० टक्के हिंदूंना ख्रिस्ती धर्मांतराच्या जाळ्यात अडकवण्यात आले आहे.
या वार्ताहराने आजारी असल्याचे भासवून छतरपूर जिल्ह्यातील एका उपचार सभेत भाग घेतला. पाद्री नथू अहिरवार याने त्याला सांगितले, ‘प्रार्थनेद्वारे रोग बरा होईल. बरा होण्यासाठी प्रत्येक रविवारी उपचार सभेला उपस्थित रहा.’ तो हे वाक्य बोलत असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. वार्ताहराने सांगितले की, जेव्हा मी सभेला उपस्थित रहाण्यासाठी आलेल्या काही लोकांशी बोललो, तेव्हा असे दिसून आले की, सर्वांनी त्यांच्या घरातून हिंदु देवतांच्या मूर्ती आणि चित्रे काढून टाकली आहेत.
त्याने सांगितले की, छतरपूर जिल्ह्यातील चांदलानगर येथे नुकत्याच झालेल्या अन्य एका सभेला तब्बल ३० गावांतील २०० हून अधिक लोक उपस्थित होते. त्यांपैकी अनुमाने १८० जण ५ वर्षांपूर्वीपर्यंत हिंदू होते; परंतु आता ते येशू ख्रिस्ताची पूजा करत आहेत.
सनातन प्रभात २८/६/२५