यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाची कास धरणारे आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणारे एक आगळे-वेगळे पाऊल रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी येथील गो-प्रेमी गणेशमूर्ती कारागीर कुटुंबाने उचलले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात 'गव्य गणेशाची' स्थापना करून गायीचे शेण तसेच शेतातील मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती घरोघरी पोहोचवण्याचा आणि त्या माध्यमातून देशी गायीला घरोघरी नेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. यामुळे एकीकडे पर्यावरणाची काळजी घेतली जाईल, तर दुसरीकडे देशी गायीचे महत्त्व आणि तिचे विविध उपयोग जनसामान्यांपर्यंत पोहोचवता येतील, अशी त्यामागची धारणा आहे.
गायीच्या शेणापासून बनवलेल्या गणेशमूर्ती या पूर्णपणे नैसर्गिक आणि पवित्र असतात आणि त्या पाण्यात सहज विरघळतात. यामुळे जलप्रदूषण टाळता येते. विसर्जनानंतर या मूर्तीचे मिश्रण खत म्हणून शेतीत वापरता येते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. यंदाच्या गणेशोत्सवासाठी शेणापासून मूर्ती घडवलेल्या दीपाली प्रणित याचे कुटुंबीय हरचेरी गावात देशी गायींचे गोवसंर्धन केंद्र चालवतात.
देशी गायीचे शेण तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारी शेतातील माती वापरून केलेल्या मूर्तीच्या निर्मितीमुळे ग्रामीण भागातील कारागिरांना आणि गो-शाळांना रोजगार उपलब्ध होतो आहे. 'गव्य गणेशा'च्या स्थापनेसोबतच, देशी गायीचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रत्येक घरात देशी गाय असावी, असा संकल्प करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेसमान मानले जाते व तिचे अनेक फायदे आहेत. देशी गाय केवळ दूध देत नाही, तर ती अनेक प्रकारे मानवासाठी उपयुक्त आहे. तिचे 'पंचगव्य' (दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण) आयुर्वेदात औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. शेणाचा वापर करून बायोगॅस तयार करता येतो, ज्यामुळे घरासाठी ऊर्जा मिळते आणि इंधनाचा खर्च वाचतो.
पुढारी २१/७/२५