वनवासी समुदायासाठी ‘जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प’ सुरू करणारे गुजरात पहिले राज्य

Vartapatra    24-Jul-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra anya_81.jpg
 
वनवासी समुदायाच्या आरोग्य सुधारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गुजरातने भारतातील पहिले वनवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाची घोषणा वनवासी विकास मंत्री डॉ. कुबेर दिन्डोर यांनी गांधीनगर येथे झालेल्या उच्चस्तरीय चर्चासत्रात केली.

या उपक्रमामुळे वनवासी समाजात आढळणाऱ्या अनुवांशिक आजारांचे जोखमी समजून घेता येणार असून त्यांच्यासाठी वैयक्तिक वैद्यकीय सेवा पोहोचवण्यात मदत होणार आहे. हा प्रकल्प गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर (जीबीआरसी) मार्फत राबवला जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील १७ जिल्ह्यांमधून २,००० वनवासी व्यक्तींचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जाणार आहे. यामुळे वनवासी समाजाच्या आनुवंशिक डेटाबेसची उभारणी होईल आणि सिकल सेल अ‍ॅनिमिया, थॅलेसीमिया, काही प्रकारचे कॅन्सर यांसारख्या वारसाहक्काने होणाऱ्या आजारांचे वेळेत निदान व योग्य उपचार शक्य होतील. शिवाय नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमतेचे निर्देशकही ओळखता येतील आणि आरोग्यविषयक प्रोफाइलनुसार खास वैद्यकीय सेवा देणे शक्य होईल.
 
या प्रसंगी बोलताना डॉ. दिन्डोर म्हणाले, हा प्रकल्प विज्ञान आणि परंपरा यांना जोडणारा मैलाचा दगड ठरेल. आपल्या वनवासी समाजाच्या आरोग्यासाठी हे एक दीर्घकालीन सुधारणा करणारे अभियान आहे. या चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी सांगितले की, वनवासी समाजाच्या आरोग्यात जिनोमिक डेटाचा फार महत्त्वाचा वाटा आहे. हा प्रकल्प केवळ वैज्ञानिक शोधापुरता मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत डेटा विश्लेषणाद्वारे समाजाला सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.

या प्रकल्पासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, ज्यामध्ये शारीरिक नमुने गोळा करण्यापासून ते जिनोमिक डेटा विश्लेषणापर्यंतची सर्व प्रक्रिया समाविष्ट आहे. ‘गुजरातमधील वनवासी लोकसंख्येसाठी संदर्भ जिनोम डेटाबेस निर्मिती’ या नावाने २०२५-२६च्या राज्य अर्थसंकल्पात मान्यता मिळालेल्या या प्रकल्पामुळे भविष्यातील संशोधन व धोरण आखणीसाठी अत्यंत महत्त्वाचा डेटाबेस तयार होईल.

मुंबई तरुण भारत १६/७/२५