आजच्या दीप अमावस्येनिमिताने ; दीपज्योती नमोस्तुते
आज आषाढ महिन्यातील अमावस्या, जिला 'दीप अमावस्या' असे म्हणतात.अंधकार नष्ट करणाऱ्या तेजोमय ज्ञानरूपात त्याला पाहिले जाते. तेजाची उपासना करण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे दिव्याची पूजा केवळ दीपावलीमध्येच करतात असे नाही तर दीप अमावास्येच्या दिवशी पण केली जाते. आजच्या दिवशी आपल्या घरातील दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवा हा केवळ प्रकाशाचा स्त्रोत नसून तो ज्ञान, सकारात्मकता आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो.
आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावण महिन्याची सुरुवात या सणाने होते. श्रावणात अनेक सण आणि व्रतवैकल्य केली जातात त्यामुळे त्याची तयारी म्हणून घराची आणि दिव्यांची स्वच्छता केली जाते.
असेही म्हणतात की अमावस्या तिथी पितरांच्या स्मरणासाठी महत्त्वाची मानली जाते. या दिवशी अनेकजण पितरांसाठी तर्पण किंवा दानधर्म करतात. दिव्यांचा प्रकाश त्यांच्या मार्गाला उजळतो अशी श्रद्धा आहे.
आजच्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून स्वच्छ केले जातात आणि एका चोरंगावर किंवा पाटावर ठेवून त्यांची पूजा केली जाते. आजच्या दिवशी कणकेचे दिवे केले जातात आणि त्यात तूप तसेच वात लावून प्रज्वलित केले जातात. हल्ली या अमावास्येला 'गटारी अमावस्या' संबोधून आपण आपल्या उदात्त परंपरेला गलिच्छ स्वरूप देताना दिसतात, ते चुकीचे आहे.
पुढारी २४.७.२५.