"झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मंगळवारी चकमकीत नक्षलवाद्यांचा सब झोनल कमांडर कुंवर मांझीचा चकमकीत खात्मा केला आहे," अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाने दिली.
त्याच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झारखंड पोलीस आणि 'सीआरपीएफ'च्या '२०९ कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शन) युनिट'ने संयुक्त कारवाईचा भाग म्हणून ही कारवाई केली. यामध्ये मांझी हा बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) या गटाचा सब-झोनल कमांडर होता. त्याने झारखंड आणि इतर नक्षलग्रस्त प्रदेशांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आणि पायाभूत सुविधांवर असंख्य हल्ले केले आहेत. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून 'एके-४७' रायफल जप्त केली आहे. त्याचप्रमाणे, अन्य साहित्यदेखील जप्त करण्यात आले आहे. चकमकीत '२०९ कोब्रा युनिट'चे 'सीआरपीएफ' कॉन्स्टेबल प्रणेश्वर कोच यांच्या चेहऱ्यावर गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी कोब्रा दलाची तैनाती महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी आपल्या मोहिमेस विशेष वेग दिला आहे.
मुंबई तरुण भारत १७/७/२५