रा. स्व संघाने अनेक देवदुर्लभ कार्यकर्ते घडवले आणि राष्ट्रचरणी अर्पित केले. अशाच एका कार्यकर्त्याला काळाने आपल्यात सामावून घेतले, ते म्हणजे आपले सुनीलराव खेडकर, साधारणपणे मे १९९८ सालातील गोष्ट. नुकत्याच भारताने अटलजींच्या नेतृत्वाखाली पोखरण येथे अणुस्फोट चाचण्या घेतल्या होत्या. सुनीलजींनी एक कल्पना मांडली की, या ऐतिहासिक घटनेचा तपशील समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी चौकाचौकांत छोट्या सभांचे आयोजन करायचे. त्यांनी स्वतः एक सभा कर्वेनगर येथे घेतली आणि अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली. पुढे ज्या ठिकाणी ही सभा झाली, त्या चौकाला 'शक्ती ९८' असे नाव देण्यात आले. 'स्व'चा बोध समाजात कसा उत्पन्न करावा, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. संभाजी भागाचे हेमंत शिबीर भुकुम येथे होते. त्या शिबिरात अपेक्षेपेक्षा बालांची संख्या वाढली. त्यामुळे व्यवस्थेवर ताण येऊ लागला. मला रात्री ११.३०-१२च्या सुमारास सुनीलरावांचा फोन आला की, "काही मदत हवी आहे का?" मी त्यांना अडचण सांगितली. रात्री २ वाजता ते स्वतः १५-२० कार्यकर्ते घेऊन शिबीरस्थानी आले आणि सर्व व्यवस्था पूर्ण करून पहाटे ६ वाजता परत गेले.
कामात पूर्णपणे झोकून देऊन कार्यकर्त्याला बळ देणे, ही सुनीलरावांची हातोटी होती. भारतीय संरक्षण दलातील संधी आणि विशेषतः शिक्षक आणि विद्यार्थी यांना त्यासंदर्भातील अत्याधुनिक माहिती याबाबतीत ते विशेष आग्रही होते. आत्मनिर्भरता केवळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करून होत नसते, तर राष्ट्र निर्माण करण्यासाठी माणूस घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, हे संघ तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले होते.
'भारतीय विचार साधने'चे सहकार्यवाह म्हणून काम करत असताना अनेक आयाम त्यांनी जोडले. स्वतः उच्चशिक्षित इंजिनिअर असलेल्या सुनीलरावांनी हिंदुत्व विचार आजच्या परिप्रेक्षात कसे मांडता येतील, यासंदर्भात आग्रही भूमिका घेऊन अनेक पुस्तकांच्या निर्मितीत योगदान तर दिलेच आणि त्या विचारांचा प्रचार-प्रसार समाजापर्यंत कसा पोहोचेल, अशा योजनाही राबविल्या.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्याकरिता ज्या ज्या घटकांनी योगदान दिले, अशा अज्ञात क्रांतिकारक, शेतकरी, जनजातींमधील योद्धे, कवी, पत्रकार, नाटककार, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, वैज्ञानिक, उद्योजक यांच्यावर 'स्वराज्य ७५' याअंतर्गत २० पुस्तकांची मालिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये अनेक लेखकांना जोडण्याचे काम त्यांनी केले. सुनीलराव मूळचे मुंबईचे. भाग सहकार्यवाह म्हणून त्यांनी संधकाम केले. पुढे नोकरी-व्यवसायाकरिता पुण्यात आल्यावर संभाजी भाग बौद्धिक प्रमुख, महानगर प्रचार प्रमुख, 'मएसो' कार्यकारिणी सदस्य, 'भारतीय विचार साधना' सहकार्यवाह अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. यांतील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे, त्यांनी त्या त्या ठिकाणी समाजातील माणसे संधकामात जोडली.
अनेक समविचारी प्रकाशन संस्थांना जोडण्यासाठी एक योजना त्यांनी आखली होती. त्यासाठी काही प्रयत्नही सुरू केले होते. पण, हे काम राहून गेल्याची रुखरुख मनात राहून गेली. 'विकसित व्हावे, राष्ट्रचरणी अर्पून जावे' हे सूत्र सुनीलरावांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले. सुनीलरावांच्या जाण्याने संपकामाची उणीव जाणवेलच, पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना है दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली....
मुंबई तरुण भारत १५/७/२५