जुन्नर तालुक्यातील थोरली शिरोली या गावात एक यादवकालीन शिलालेख उजेडात आला आहे. हा शिलालेख तीन ओळींचा असून देवनागरी लिपीत आणि मराठी भाषेत आहे. शिलालेखात काळाचा उल्लेख आलेला नाही, परंतु लिपीच्या वळणावरून तो तेराव्या शतकातील दिसतो.
या लेखाची शिळा गावातील रहिवासी गुलाबराव थोरवे यांच्या घरातील एका लहान देवळात ठेवलेली आहे. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या लेखाचे वाचन पुण्यातील इतिहास संशोधक अथर्व पिंगळे आणि अनिल दुधाणे यांनी केले. या शिलालेखाच्या मजकुरात एका सिंघणदेवाचा उल्लेख असून तो यादव वंशातील सर्वश्रेष्ठ राजा सिंघणदेव द्वितीय याचा आहे. या राजाची कारकीर्द ११९९-१२४८ अशी होती. त्याने गुजरात,माळवा,कर्नाटक,आंध्र,कोसल(छत्तीसगड) आणि कलिंग(ओडीशाचा दक्षिण भाग) अशा शेजारील राज्यांवर अनेक स्वाऱ्या करून मोठा राज्यविस्तार घडवून आणला होता. या सिंघणदेवाने कसण्यासाठी काही जमीन दान केल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे.
श्रीसीघदेवे दत कं, मथाची सटी सुस्तु, (जो दाना ) न पालि अशा या तीन ओळी आहेत, ज्याचा अर्थ 'राजा सिंघणदेव याने कसण्यासाठी जमीन दान दिली असून, त्याचा सहावा हिस्सा दान स्वरूपात द्यावा. हे दान कोणी चोरेल किंवा त्याचा अव्हेर करेल त्याच्या मातेसोबत गाढव संकर करेल,' असा होतो.
सकाळ १०.७.२५