लिपीच्या संवर्धनासाठी तेजस लोखंडे या तरुण विद्यार्थ्याचा अभिनव उपक्रम 'वारी' हे जसे महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित आहे तशीच मोडी लिपी महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे. इतिहासाचा अनमोल खजिना उलगडण्यासाठी मोडी लिपीचा आधार घ्यावा लागतो. एका बाजूला मोडी लिपीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना तेजस लोखंडे या तरुणाने आणि त्यांच्या 'स्वराज्यकला' या प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून मोडी लिपी माध्यम पटलावर आणण्याचे काम केले आहे.आषाढी वारीनिमित्त १८ दिवस रोज एक अभंग आणि त्यावर मोडी लिपीतून अभंग असा सुलेखनाचा उपक्रम तेजस लोखंडे यांसह त्यांच्या विद्यार्थांनी साकारला. आयुर्वेद पंचकर्म तज्ञ असणाऱ्या तेजस यांनी मागची दोन वर्षं आपल्या दवाखान्यातील केस पेपर्ससुद्धा मोडी लिपीमध्ये लिहिले आहेत. आपल्या देशावर जी काही आक्रमणे झाली त्या आक्रमणकर्त्यांनी आपली भाषा आणि लिपी शिकून घेतली मग आपण तर मोडी भाषा शिकलीच पाहिजे असे तेजस लोखंडे यांचे मत आहे. ते असे म्हणतात की, "मोडी लिपी हे मराठी भाषेचे प्रमुख अंग आहे. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा लक्षात घेता नव्या पिढीपर्यंत भाषेविषयक हा विचार पोहोचला पाहिजे. या उपक्रमामध्ये अगदी परदेशातील माझे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते."
मुं.त.भा ९.७.२५.