पुणे येथील संदीप आणि सायली जोशी या दांपत्याने १९९८ मध्ये सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट (SERI) ही संस्था स्थापन केली होती. संदीप जोशी यांना 'पर्यावरण शल्य विशारद' ('ग्रीन सर्जन') म्हणून जगभर ओळखले जायचे. त्यांच्या 'ग्रीन ब्रिज' या तंत्रावर तर संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमांनी (यूएनईपी) शिक्कामोर्तब केले आहे. आंतरराष्ट्रीय जलाशय पर्यावरण समिती (आयलेक) या जपान सरकारच्या समितीबरोबरही ते जलतज्ज्ञ म्हणून काम पाहत होते. आंतरराष्ट्रीय जलाशय परिषद व आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेतही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. केनिया, झिम्बाब्वे या देशातही त्यांनी पर्यावरण व नदी सुधार योजनेसाठी सल्लागार म्हणून काम केले होते. त्यांच्या ग्रीन ब्रिज तंत्रज्ञान व नदी सुधारणा क्षेत्रातील कामांबद्दल फिलिपिन्स येथील लॉस बॅनर्स विद्यापीठाने गौरव केला होता. दुर्दैवाने २०१४ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने संदीप जोशी यांचे दुःखद निधन झाले. मात्र त्यांच्या पश्चात आजही सायली जोशी यांच्या नेतृत्वात सेरी ही संस्था कार्यरत आहे. गंगा नदीच्या अनेक उपनद्यांवर ग्रीन ब्रिज तंत्रज्ञानाच्या साह्याने शुद्धीकरणाचे काम सुरू आहे.
ग्रीन ब्रिज तंत्राने पाणी प्रदूषण निर्मूलनाच्या कामाची सुरुवात होते ती त्या प्रवाहाविषयी अधिक माहिती गोळा करण्यातून. त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थितिकी (इकोसिस्टीम) समजून घेतली जाते. पाण्यातील दूषित पदार्थांतील घटक, त्यांचे प्रमाण यानुसार योग्य उद्दिष्ट ठरवले जाते. ते साध्य करण्यासाठी प्रकल्पाची आखणी केली जाते.विविध हंगामामध्ये प्रवाहाची रुंदी किती आहे? पावसाळ्यात पाणी आल्यावर तो किती पसरतो? त्याचा वेग व विसर्ग किती असतो? हे दूषित पाणी विशिष्ट उंचीला अडवले तर पाण्याचा थोप कोठवर जाईल? त्यामुळे काठावर काय परिस्थिती असेल ? प्रवाहाचे पाणलोट (कॅचमेट) कुठून सुरुवात होते, कोठून काय काय वाहत येते? त्यात मिसळले जाणारे दूषित पाणी, औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी अशा घटकांची नोंद घेतली जाते.सांडपाण्यातील विविध प्रदूषित घटक, त्यांचे प्रमाण, २४ तासांत त्यांच्या प्रमाणात होणारे बदल, २४ तासांत विसर्गात (discharge) होणारे बदल, त्यामुळे रासायनिक गुणधर्मात होणारे बदल यांचा विचार केला जातो.प्रत्येक जलस्रोताचे स्वतःचे वैशिष्ट्य असते. तेही लक्षात घ्यावे लागते. उदा. काही प्रवाहात पाणी खूप संथ असते, तर खोली खूप असते. काही नद्यांमध्ये कठीण खडक असतात, तर काही नद्यांच्या तळाशी वाळूचे खूप उंच थर असतात. असे वेगवेगळे टप्प्यात नदी किंवा प्रवाहाची निरीक्षणे नोंदवत मोजमापे घेतली जातात.यानंतर समजून घ्यावी लागते ती नदीची किंवा प्रवाहाची परिस्थितिकी (इकोसिस्टीम).क्रमश:अग्रोवन १३/६/२५