बांगलादेशातील १,४०० वर्षे जुन्या शिवचंडी मंदिराच्या जमिनीवर अतिक्रमण

Vartapatra    25-Jun-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra islamic_30
 
बांगलादेशातील कोमिल्ला जिल्ह्यातील लालमाई हिल्स भागातील चांदीमुरा परिसरात असलेल्या १,४०० वर्षे जुन्या शिवचंडी मंदिराच्या जमिनीवर अब्दुल अली नामक व्यक्तीने अतिक्रमण करून घर बांधून ती त्याची वडिलोपार्जित मालमत्ता असल्याचा दावा केला आहे.

बांगला ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, कोमिल्ला जिल्ह्यातील अयुब अली यांचा मुलगा अब्दुल अली याने शनिवारी २१ जूनला मंदिराच्या जमिनीवर एक तात्पुरते पत्र्याचे घर बांधले आणि ती जमीन त्याची वडिलोपार्जित मालमत्ता म्हणून घोषित केली. शिवचंडी मंदिरातील एका महिला सेविकेने या बेकायदेशीर अतिक्रमणाला विरोध केला तेव्हा अली आणि त्याच्या माणसांनी तिच्यावर हल्ला केला. पीडित महिलेचे नाव चंदना राहुत असे आहे.

मंदिर प्रशासनाच्या तक्रारीनंतर, उपजिल्हा निर्बाही अधिकारी (UNO) रुबैया खानम आणि पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रफिकुल इस्लाम यांनी शनिवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली आणि अब्दुल अली यांना बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. खानम यांनी शिवचंडी मंदिर समितीला मंदिराने त्यांच्या जमिनीवर बांधलेले विश्रामगृह काढून टाकण्यास सांगितले. खानम यांच्या मते, ही जमीन वादग्रस्त आहे आणि प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

दरम्यान, अब्दुल अली याने दावा केला की, "माझ्या वडिलांनी ही जमीन खरेदी केली होती. पण कागदपत्रांमध्ये ती मंदिराच्या नावावर नोंदवलेली आहे. कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी मी खटला दाखल केला आहे." शिवचंडी मंदिर समितीचे अध्यक्ष दीपक साहा यांनी त्यांच्या दाव्याचे खंडन केले आणि म्हणाले, "प्रवेशद्वाराच्या पश्चिमेकडील ६०० एकर जमीन मंदिराच्या नावावर नोंदणीकृत आहे. अलिकडेच आम्ही या जमिनीवर भाविकांसाठी एक विश्रामगृह बांधले होते. परंतु शनिवारी त्याने (अब्दुल अली) आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून येथे घर बांधले."


मुंबई तरुण भारत २३/६/२५