आंध्र प्रदेशात चकमक; ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Vartapatra    21-Jun-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra naxalvad_13
 
आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन प्रमुख नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यामध्ये गजराला रवी उर्फ उदय, अरुणा आणि अंजू यांचा समावेश आहे. रवी हा ‘सीपीआय’ माओवादीच्या केंद्रीय समितीचा सदस्यदेखील होता.
‘ग्रे-हाऊंड’ पथकाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक देवपट्टणमच्या जंगलात झाली. हा परिसर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर आहे. पोलीस जंगलात शोध मोहीम राबवत असताना त्यांना काही नक्षलवाद्यांचा गट दिसला. पोलिसांनी प्रथम त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले असता, त्यांच्याकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये केंद्रीय समिती सदस्य गजराला रवी उर्फ उदय, नक्षलवाद्यांच्या दक्षिण विभागीय समितीची सदस्य आणि नुकत्याच मारल्या गेलेल्या केंद्रीय समिती सदस्य चलपतीची पत्नी रावी वेंकट चैतन्या उर्फ अरुणा आणि ‘एरिया समिती’ सदस्य अंजू यांचा समावेश आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर लाखो रुपयांचे बक्षीस होते.

मध्य भारतातील नक्षलांचा कणा मोडला

नक्षलवाद्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य आणि आंध्र-ओडिशा सीमा विशेष क्षेत्रीय समितीचा (एओबीएझेडसी) सचिव असलेला गजराला रवी हा 1990 सालापासून नक्षली कृत्यांमध्ये सहभागी होता. केंद्रीय समितीमध्ये त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. नक्षली हल्ले, सुरक्षादलांवर हल्ले आणि वैचारिक प्रचारात तो सहभागी होता. केवळ आंध्र-ओडिशा भागातच नव्हे, तर संपूर्ण मध्य भारतातील नक्षली कारवायांचा तो सूत्रधार होता. त्याच्यावर 40 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यांच्या खात्म्यामुळे प्रामुख्याने मध्य भारतातील नक्षलांचा कणा मोडला आहे.

महिला विंगलाही धक्का
 
अरुणा ही विशाखापट्टणम जिल्ह्यातील करकवणीपालेम गावची रहिवासी होती. ती नक्षलवादी चलपतीची पत्नी होती. दंडकारण्य येथे नुकतेच चलपतीचा खात्मा करण्यात यश आले होते. अरुणा सुमारे 25 वर्षे संघटनेत सक्रिय आणि महिला शाखेची प्रमुख होती. ती महिला शाखेची प्रमुख आणि समन्वयक म्हणून काम करत होती.

मुंबई तरुण भारत १९/६/२५