नक्षलग्रस्त दंतेवाड्यात विकसित होणार ५० मैदाने

Vartapatra    18-Jun-2025
Total Views |

sanskrutik vartapatra naxalvad_12 
दंतेवाडा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून कात टाकतो आहे. स्थानिक प्रशासनाच्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमांमुळे खेळाची नवी संस्कृती इथे विकसित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे शासनाच्या उपक्रमाला सचिन तेंडुलकर फाउंडेशनचा हातभार लागला आहे.

नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होत चाललेल्या या जिल्ह्यात प्रशासनाने माणदेशी फाउंडेशन आणि सचिन तेंडुलकर फाउंडेशन यांच्या सहकार्याने मैदान कप या उपक्रमाची सुरुवात केली आहे. याअंतर्गत दंतेवाड्यातील खेळ संस्कृती आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी ५० खेळांची मैदाने विकसित केली जाणार आहेत.

दंतेवाड्याचे जिल्हाधिकारी कुणाल दुदावत यांनी पीटीआयला सांगितले की, 'या प्रकल्पांतर्गत सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यात किमान २० खेळांची मैदाने विकसित करण्यात आली असून, ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण लक्ष्य गाठले जाईल.'

सचिन तेंडुलकर फाउंडेशनचा पुढाकार

दुदावत म्हणाले की, यामागील उद्दिष्ट नक्षल प्रभावित आणि संवेदनशील जिल्ह्यांतील खेळाडूंना खेळाच्या माध्यमातून जगाशी जोडणे हे होते. त्याच धर्तीवर, सचिन तेंडुलकर फाउंडेशन आणि माणदेशी फाउंडेशनच्या सहकार्याने आम्ही मुलांना आणि युवकांना समर्पित खेळाची मैदाने उपलब्ध करून देण्यासाठी मैदान कप' सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ५० गावांमध्ये ५० मैदाने विकसित केली जातील आणि पुढील टप्प्यात हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवला जाईल. आतापर्यंत विकसित करण्यात आलेल्या २० मैदानांमध्ये १३ विविध खेळांचे तंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्यात रनिंग ट्रॅक, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, वॉल क्लायंबिंग यांचा समावेश आहे.
मागील वर्षी राज्य शासनाने बस्तर विभागातील दंतेवाडा आणि इतर सहा जिल्ह्यांतील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी बस्तर ऑलिम्पिक २०२४चे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी दुदावत यांनी
सांगितले की, जिल्हा प्रशासन स्वतः ही मैदाने उभारू शकली असती; पण उद्देश असा होता की युवक आणि मुलांना आकर्षित करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असावा म्हणून या उपक्रम राबविण्यात आला.

लोकमत १६/६/२५