जगाने पाहिली 'सिंदूर' ची ताकद

Vartapatra    09-May-2025
Total Views |

sanskrutik vartapatra mahila_The world has seen the power of  
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीरीत्या पार पाडले. पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची ही मोहीम कशी पार पडली, याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याची जबाबदारी सशस्त्र दलांतील कर्नल सोफिया कुरेशी व विंग व्योमिका सिंह या दोन कमांडर महिला अधिका-यांवर सोपवण्यात आली. ही निवड विलक्षण सूचक मानली जाते.

विंग कमांडर व्योमिका सिंह
ज्यांच्या नावातच आकाश (व्योम) आहे, अशा विंग कमांडर व्योमिका सिंह हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून काम करतात. देशाच्या सशस्त्र सैन्य दलात सहभागी होणाऱ्या त्या कुटुंबातील पहिला महिला आहेत. सहावीत असताना त्यांनी हवाई दलात सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले. नंतर मेहनतीने ते साकारही केले. शाळेत असताना 'नॅशनल कॅडेट कोअर'पासून एनसीसी) सुरू झालेला व्योमिका यांचा प्रवास २०१९ मध्ये हवाई दलात प्रवेश केल्यावर आणखी प्रशस्त झाला. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी हवाई दलातील सेवा सुरू केली. भारतीय हवाई दलात त्यांना हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून नियुक्त करण्यात आले. १८ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना 'फ्लाइंग ब्रांच मध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळाले.

विंग कमांडर व्योमिका यांना जोखीम असलेल्या उंचीवरील भागांत विमानोड्डाणांचा अनुभव आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्येसह अनेक कठीण प्रदेशांत 'चेतक' आणि 'चित्ता' यांसारख्या हेलिकॉप्टरचे संचलन केले. व्योमिका सिंह यांनी अनेक बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी केलेल्या प्रमुख हवाई मोहिमांमध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये अरुणाचल प्रदेशातील मोहिमेचा समावेश आहे. अरुणाचलसारख्या अत्यंत दुर्गम व कठीण प्रदेशात त्यांनी हवाई दलासाठी कार्य केले.


कर्तबगार कर्नल सोफिया कुरेशी
मूळच्या गुजरातच्या असलेल्या व १९८१मध्ये बडोदा येथे जन्मलेल्या सोफिया कुरेशी यांचे शिक्षण गुजरातमध्ये झाले. त्यांनी बायोकेमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आजोबा व वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनीही लष्कराची वाट निवडली. त्यांच्या वडिलांनी काही वर्षे सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम केले. सोफिया यांचा विवाह लष्करातील मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी असलेले मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झाला आहे.

कर्नल सोफिया यांनी १९९० मध्ये लष्करातील सेवा सुरू केली. त्या 'सिग्नल कोअर मध्ये कार्यरत आहेत. भारतीय सैन्याच्या संप्रेषण आणि माहिती प्रणालींची जबाबदारी या तुकडीवर असते. सोफिया यांनी यापूर्वी लष्कराच्या देशविदेशांतील अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये यशस्वी सहभाग घेतला. २००६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या काँगोमधील शांतता मोहिमेत सक्रिय सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सहा वर्षांहून अधिक काळ शांतता मोहिमांमध्ये महत्वाची भूमिका बजावली. वयाच्या ३५व्या वर्षी, २०१६मध्ये लेफ्टनंट कर्नल असताना पुण्यात दोन ते आठ मार्चदरम्यान झालेल्या बहुराष्ट्रीय सैन्य सरावात लष्कराच्या 'एक्सरसाइज फोर्स १८' या तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले होते. अशी कामगिरी करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला लष्कराधिकारी ठरल्या, भारताकडून केलेला हा आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा युद्धसराव ठरला. या युद्धसरावात १८ देश सहभागी झाले होते. 'शक्य असल्यास भारतीय सैन्यात सहभागी व्हा,' असा संदेश त्यांनी अर्थपूर्ण आणि आव्हानात्मक करिअर शोधणाऱ्या तरुण भारतीय महिलांना दिला आहे.

सकाळ ८/५/२५