कुक्कुटपालन सल्ला- भाग १
कोंबड्यांना द्या पोषक आहार:उष्णतेच्या ताणामुळे, कोंबड्या खाद्य कमी खातात. यामुळे शारीरिक क्रिया, उत्पादन आणि प्रजोत्पादन क्रिया मंदावते. शेडमधील तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यावर उष्णतेची तीव्रता जाणवायला लागते. त्यामुळे कोंबड्या श्वास तोंडावाटे घेतात, धापा टाकतात, वारंवार पंख वर करतात, पोट जमिनीला घासतात, डोळे बंद करतात. त्यांची भूक मंदावते, पाणी जास्त पितात, अंडी कमी व लहान आकाराची देतात. मांसल कोंबड्याचे वजन कमी होऊन मांसाच्या गुणधर्मात विपरीत बदल होतो. प्रजोत्पादन व अंड्यांची गुणवत्ता यावर परिणाम होत असतो. उष्णतेमुळे पिसाचा रंग बदलतो, त्वचा खरबरीत होते. कोंबड्यांच्या मेंदूवर आघात होतो.
व्यवस्थापनातील बदल:शेडमध्ये पंखे, फॉगर्स, पडदे आणि निवाऱ्यातील तापमान नियंत्रित करणारी उपकरणे लावावीत.
शेडला उष्णतारोधक पत्रे लावावेत. बाहेरील शुद्ध हवा आत येण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा निवाऱ्याच्या छतावर लावावी.
उष्णतेच्या ताणामुळे कोंबड्या खाद्य कमी खातात, पाणी जास्त पितात, यामुळे कोंबड्यांचे शारिरिक तापमान काही प्रमाणात संतुलीत राहते. साधारणपणे, कोंबड्यांना उष्णतेच्या ताणापासून बचाव करण्याकरिता १ टक्का खाद्य प्रत्येक १ अंश सेल्सिअस तापमानाकरिता (२२-३२ अंश सेल्सिअस) कमी करावे आणि ५ टक्के खाद्य प्रत्येक १ अंश सेल्सिअस तापमानाकरिता (३२-३८ अंश सेल्सिअस) या प्रमाणात कमी द्यावे. यामुळे अंडे देण्याचे प्रमाण, गुणवत्तेमध्ये सुधारणा होते.
ॲग्रोवन ५.४.२५