यमगरवाडीच्या प्रकल्पातील पारधी समाजातील पहिला विद्यार्थी झाला डॉक्टर

Vartapatra    30-Apr-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra vyaktivishesh _doctor-arjun-chavan-yamgarwadi-success-story.jpg
 
रानोमाळ भटकंती करावी लागणारे अर्जुन जनाबाई महादू चव्हाण आणि त्याची तीन भावंडे सन २००५ मध्ये यमगरवाडी प्रकल्पात दाखल झाले. त्या वेळी अर्जुन केवळ ४-५ वर्षांचा लहान मुलगा होता, तर त्याचा धाकटा भाऊ राम फक्त चार महिन्यांचा होता. रेखा, अर्जुन, शीतल आणि राम अशी ही चार भावंडे. त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे चारही मुलं अनाथ झाली. नातेवाईकांत कोणीही सांभाळ करेल अशी परिस्थिती नसल्याने, एका सज्जन व्यक्तींने पुढाकार घेऊन चारही मुलांना यमगरवाडी  भटके विमुक्त विकास  प्रकल्पात पोचवले. यमगरवाडी प्रकल्पाने पुढे त्यांचे आई-वडील होण्याची जबाबदारी घेतली.

सन २००५ ते २००६ दरम्यान अर्जुनने अंगणवाडीत प्राथमिक शिक्षण घेतले आणि २००६ ते २०१३ या कालावधीत यमगरवाडीत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, २०१३ ते २०१६ दरम्यान बीड जिल्ह्यातील डोमरी गुरुकुलात आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले.

पुढील शिक्षणासाठी अर्जुनने लातूर जिल्ह्यातील शाळेत प्रवेश घेऊन २०१६ ते २०१८ या कालावधीत अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, २०१९ ते २०२५ दरम्यान, श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नाशिक येथे बीएएमएस (BAMS) पदवीचे शिक्षण घेतले. अर्जुनने अत्यंत बिकट परिस्थितीत जिद्द व मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न साकार केले.

यमगरवाडी मधील एकलव्य शिक्षण संकुलातील पारधी समाजाचा तो पहिला विद्यार्थी आहे जो डॉक्टर बनला आहे. अर्जुनचे यमगरवाडी परिवार आणि भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे खूप खूप अभिनंदन व त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा!
 
राजेश पवार, इचलकरंजी सेवाभारती प्रकल्प