भारत आणि कॅथोलिक चर्च यांचे संबंध हे केवळ धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातूनही अनेकदा तणावपूर्ण राहिले आहेत. भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रवेश व प्रसार हा मुख्यत्वे परकीय आक्रमकतेच्या पाठबळावर झाला. विशेषतः पोर्तुगीज वसाहती काळात गोवा इन्क्विझिशनसारख्या भीषण घटनांतून हिंदू समाजावर अमानुष अत्याचार झाले. या पार्श्वभूमीवर पोप आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मुख्यतः धर्मांतराच्या संधी म्हणून राहिल्याचे दिसून येते.
१९९९ मध्ये पोप जॉन पॉल दुसऱ्याच्या 'एक्लेशिया इन एशिया' (Ecclesia in Asia) या जाहीरनाम्यातील विधान विशेष उल्लेखनीय आहे, ज्यात भारतासारख्या देशात ‘धर्मांतराचे महान पीक घेणे’ हे चर्चचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले गेले. त्याचबरोबर त्याने “हिंदू मूल्यांना येशूमध्येच परिपूर्णता प्राप्त होते” असे विधान करून हिंदू तत्त्वज्ञानाचे गौणत्व सूचित केले. त्यानंतर पोप बेनेडिक्ट सोळावा यांनी भारतातील धर्मांतरविरोधी कायद्यांना विरोध दर्शवला आणि हिंदू देवतांबद्दल अपमानजनक वक्तव्ये केली. पोप फ्रान्सिस २२ एप्रिलला निधन झाले, त्यांनी काही वेळा धर्मांतरावरील भूमिका सौम्य शब्दांत मांडली असली, तरी चर्चचा मूळ ‘अजेंडा’ – म्हणजे ख्रिस्तीकरण – अद्याप कायम आहे.
आजही भारतात विविध राज्यांमध्ये, विशेषतः आदिवासी आणि मागास भागांत मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालू आहे. या संदर्भात पोप संस्थेच्या भूमिकेचे, तिच्या धोरणांचे आणि भारतावरील तिच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचे विश्लेषण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
वायुवेग २४/४/२५