अहमदाबाद : गेल्या २० वर्षांत भारतातील थर वाळवंट ३८ टक्के अधिक हिरवे झाले असून, यामागे हवामान बदल आणि शेतीचा झपाट्याने झालेला विस्तार, हे दोन प्रमुख घटक असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दशकांत धर वाळवंटात अधिक लोक राहायला लागले असून, त्यांनी तेथील भूभाग शेतीसाठी आणि नागरी वापरासाठी बदलला आहे. या बदलांमुळे वाळवंटातील हरित क्षेत्र वाढले आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हवामान बदलामुळे प्रभागात मान्सून दरम्यान होणाऱ्या पर्जन्यमानात मोठी वाढ झालं आहे.
थर वाळवंट, ज्याला ' इंडियन डेझर्ट' असेही म्हणतात, हे वायव्य भारत आणि आग्नेय पाकिस्तानमध्ये पसरलेले असून याचे क्षेत्रफळ सुमारे २ लाख चौरस किलोमीटर आहे. या वाळवंटाचा ८५ टक्के भाग भारतात राजस्थान, गुजरात आदी राज्यांमध्ये असून १५ टक्के भाग पाकिस्तानच्या हद्दीत आहे. जगातील इतर वाळवंटांमध्ये दुष्काळ अधिक तीव्र होत असताना थर वाळवंटात नागरीकरण आणि शेतीचा विकास वेगाने झालेला दिसतो. त्यामुळे हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले वाळवंट बनले आहे, जेथे १६ मिलियन (१.६ कोटी) हून अधिक लोक राहतात.
आयआयटी गांधीनगर येथील सिव्हिल इंजिनिअर आणि अभ्यासाचे सहलेखक विमल मिश्रा यांनी सांगितले की, "पाण्याची आणि ऊर्जेची उपलब्धता वाढल्याने शेती व नागरी क्षेत्रांचा विस्तार झाला आहे. परिणामी, पिकांचे उत्पादनही लक्षणीयरीत्या वाढले आहे. जगातील इतर कोणत्याही वाळवंटात अशा प्रमाणात नागरीकरण, शेती आणि पर्जन्यमान वाढलेले दिसत नाही."
३ एप्रिल रोजी Cell Reports Sustainability' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात २००१ ते २०२३ दरम्यानच्या उपग्रहचित्रांचे विश्लेषण करण्यात आले. मिश्रा आणि त्यांच्या टीमला आढळून आले की, या कालावधीत वाळवंटात सरासरी ३८% हरिततेत वाढ झाली आहे. पावसात झालेल्या ६४% वाढीमुळे तसेच मान्सूनशिवाय इतर काळात भूगर्भजलाच्या सिंचनामुळे हा हरित विस्तार शक्य झाला.