सातारा:(गुलाबाचे गाव) महाबळेश्वर तालुक्याने देशाला पहिले मधाचे गाव मांघर व पुस्तकांचे गाव भिलार अशी दोन गावे दिली. त्यातच नव्याने किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी श्रीरामवरदायिनी देवीचे मंदिर असलेल्या पारपार (ता. महावळेश्वर) येथे गुलाबाचे गाव साकारत आहे. गावातील प्रत्येक घरासमोर व रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली असून, घरांना गुलाबी रंग देण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत गुलाब फुलल्यानंतर पूर्ण परिसर गुलाबी नखर्यात हरवून जाणार आहे. त्यामुळे रोजगारासोबतच पर्यटनवाढीलाही मोठी चालना मिळणार आहे.
गावाला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व
गावात शिवकालीन श्रीरामवरदायिनी देवीचे मंदिर आहे. ही देवी नवसाला पावते, अशी तिच्या भक्तांची भावना आहे. पारपार या गावाला शिवकालीन बाजारपेठ असून, इतिहासकालीन महत्त्व आहे. तसेच, शिवकालीन पूल, राजमार्ग, मेटपारमधून कोकण दर्शन, असे या गावाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भाविकांची आणि पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. गुलाबाच्या गावामुळे पर्यटकांची वर्दळ आणखी वाढेल असा अंदाज आहे.
गावामध्ये रोजगार वाढणार
पारपार या गावात गुलाबाच्या रोपांची लागवड होत आहे. त्यामुळे गुलाब फुलापासून गुलाब सिरप, अत्तर, गुलकंद उत्पादक गावातच निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगासाठी फुलांची विक्री सुरू झाल्यास गुलाब शेती वर्षभरासाठी करता येईल. त्यामुळे गावातील युवक व नागरिकांना रोजगार निर्माण होण्याबरोबर पर्यटनवाढीसाठी मदत होणार आहे.
नावीन्यपूर्ण उपक्रमातून गुलाबाचे गाव म्हणून पारपारची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या पुढाकारातून गुलाबाची रोपे लावण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन पर्यटनाचा पॉईंट तयार होत असल्याने महाबळेश्वरला येणारे पर्यटक गावाला भेट देतील, त्यातून गावाची आर्थिक उन्नती होणार आहे.
पुढारी २.३.२५