बांगलादेशातील दिनाजपूर येथे भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली

Vartapatra    16-Apr-2025
Total Views |
 
sanskrutik-vartapatra-hindu-sanskruti_Bangladesh-Dinajpur-Vishnu-idol-discovered
 
बांगलादेशातील दिनाजपूर येथील एका तलावात भगवान विष्णूची मूर्ती सापडली आहे. बांगलादेशात भूमी आणि तलाव यांमध्ये भगवान विष्णूची मूर्ती सापडण्याची गेल्या ४ वर्षांतील ही चौथी घटना आहे.

१. दिनाजपूर मधील नवाबगंज भागात एका तलावाचे खोदकाम चालू होते. या वेळी भगवान विष्णूची २९ इंच आणि १३ इंच रुंदीची मूर्ती सापडली. या मूर्तीचे वजन २७ किलो आहे. या मूर्तीमध्ये भगवान विष्णू समवेत देवी लक्ष्मीची प्रतिमादेखील कोरलेली आहे. विशेष म्हणजे बुलडोझरने खोदकाम करूनही मूर्तीचा कोणताही भाग तुटला नाही.

२. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूर्ती कह्यात घेऊन कोषागारात पाठवण्यात आली आहे. तेथून ही मूर्ती पुरातत्व विभागाकडे पाठवली जाईल. पुरातत्व विभाग पुतळ्याची पडताळणी करेल आणि ही मूर्ती कधी बनवली, हे सांगेल.

३. वर्ष २०२३ च्या मध्ये बांगलादेशातील फरीदपूरमध्ये भगवान विष्णूची मूर्ती सापडली होती. या मूर्तीचे वजन ३२ किलो होते. ऑगस्ट २०२१ मध्ये बांगलादेशामध्ये भगवान विष्णूची १ सहस्र वर्ष जुनी मूर्ती सापडली होती.

४. बांगलादेशात ज्या ठिकाणी भगवान विष्णूची मूर्ती सापडली, तिथे एक राजवाडा आहे. पूर्वी येथे एक हिंदू राजा रहात होता. तो भगवान विष्णूचा भक्त होता. असे म्हटले जात आहे की, त्याच्या राजवाड्यातील मूर्ती तलावामध्ये टाकली गेली असावी.

५. पूर्वी बंगाली हिंदू कुटुंबातील लोक बांगलादेशात रहात होते. जसजशी त्यांची लोकसंख्या अल्प होत गेली, तसतशी तेथील मंदिरे नष्ट झाली आणि देवांच्या मूर्ती भूमीखाली गेल्या. आता उत्खनन होत असतांना त्या मूर्ती बाहेर सापडत आहेत.



सनातन प्रभात ८/४/२५