बाबासाहेब आंबेडकर:
“हे त्या हिंदू धर्माचे महान तेजस्वी तत्व आहे. हे कोणासही नाकबूल करता येणार नाही....
विषमता व अस्पृश्यतेच्या संदर्भात अत्यंत वाईट अनुभव आल्यानंतर जेव्हा समाज सुधारणेसाठी पूजनीय बाबासाहेबांनी कार्य सुरू केले तेव्हा त्यांना असे लक्षात येत होते की, हिंदू धर्माचे सिद्धांत कितीतरी पटीने चांगले आहेत, परंतु समाज त्या तत्वांना समजून घ्यायला कमी पडतोय. जो धर्म समतेला व मानवतेला महत्त्व देतो तोच आज अस्पृश्यता सारख्या रोगाने शापबद्ध झालेला आहे. हे हिंदूंना का कळत नाही? या विचाराने बाबासाहेब दुःखी होत.
बाबासाहेब म्हणतात, "हिंदू धर्माचा सिद्धांत ख्रिस्ती व महंमदी धर्माच्या सिद्धांतापेक्षा कितीतरी पटीने समतेच्या तत्वाला पोषक आहे. माणसे ईश्वराची लेकरे आहेत, एवढयावरच न थांबता ती ईश्वराचीच रूपे आहेत, तेथे कोणी उच्च, कोणी नीच, असा भेदभाव करणे शक्य नाही. हे त्या हिंदू धर्माचे महान तेजस्वी तत्व आहे. हे कोणासही नाकबूल करता येणार नाही. समानतेचे साम्राज्य स्थापण्यासाठी यापेक्षा दुसरा मोठा आधार सापडणे कठीण दिसते." असे सांगून बाबासाहेब हिंदू धर्माच्या तत्वाचे वर्णन करतात.
बाबासाहेब पुढे म्हणतात, "असे असूनही ख्रिस्ती व महंमदी राष्ट्रात जी सामाजिक समता दिसते तिचा आपल्याकडे मागमूसही दिसत नाही. ती प्रस्थापित व्हावी म्हणून जे पवित्र प्रयत्न चालू आहेत त्याला हिंदू धर्मीय म्हणवणाऱ्या लोकांकडूनच विरोध व्हावा, यावरून हिंदू धर्मीय म्हणवणाऱ्या या लोकांना खऱ्या हिंदू धर्माची किती कमी ओळख आहे, हे दिसून येते" असेही बाबासाहेब सांगतात.
पूजनीय बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला होताच, शिवाय अन्य धर्माच्या तत्वांचा व धार्मिक ग्रंथांचाही अभ्यास केला होता. त्यामुळेच इतकी मोठी वस्तुस्थिती ते निर्भीडपणे मांडू शकले. हिंदू धर्माकडे त्यांनी द्वेषभावनेने न बघता वाईट गोष्टींवर ममत्वाने घाव घातले आहेत. हिंदू धर्म सुधारणा होण्यासाठीच त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले परंतु समाज आणि कर्मठ लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्यांनी भारतीय भूमीत जन्मलेल्या बौद्ध पंथाचा (Religion) स्वीकार केला.
www.vskdevgiri.com
संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखक - धनंजय कीर, पृष्ठ क्र. ९०, ९१