मुंबई- राज्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगाल, आसाम आणि कर्नाटक राज्यातून कागदपत्रे मिळाल्याचे तपासात उघड झाले आहे, असे उत्तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला दिले. सोलापूर येथे १२ आणि मुंबई, बंगलोर येथे प्रत्येकी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
आ. सुभाष देशमुख यांनी सोलापूर एमआयडीसी 'नई जिंदगी' भागात विमानतळाशेजारी आणि कणबस - द. सोलापूर येथे अवैध मार्गाने आलेले बांगलादेशी राहत असल्याचे निदर्शनास आणून दिले. हे बांगलादेशी आधारकार्ड मिळवून राहतात असेही त्यांनी सांगितले. तसेच, शासनाने कारवाई करावी अशी मागणी केली.
उत्तरात गृहराज्यमंत्री भोयर म्हणाले, एमआयडीसी अक्कलकोट रोड येथे बांगलादेशी अनधिकृतरित्या राहतात असे समजल्यावर दहशतवादविरोधी पथक, एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी कारवाई केली. सदर कारखान्यात १२ बांगलादेशी आढळले. त्यांच्या जबाबानंतर बंगलोर आणि भिवंडी येथून अन्य दोघांना ताब्यात घेतले. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींच्या ताब्यातून ६८ हजार, ५०० रुपये किमतीचे १२ मोबाईल, सिमकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट जप्त केले आहेत. संबंधीत कंत्राटदारालाही अटक करण्यात आली आहे. कोणालाही कामावर घेताना हमीपत्र घेणे बंधनकारक आहे, असेही गृहराज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.
मुंबई तरुण भारत २२.३.२५