नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सित्रर येथील युवा मित्र संस्थेने महाराष्ट्र व मध्य प्रदेशात जलसंकट अभ्यासले. त्यावर मात करण्यासाठी ' ग्लेनमार्क फाउंडेशन'च्या मदतीने जलस्रोतांचा पुनर्विकास करण्यासाठी 'जलकवच' प्रकल्प हाती घेतला. त्यातूनच आज महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील १९ गावे पाणीदार झाली आहेत. पाणी संकटाचा सामना करणाऱ्या या गावातील कृषी आधारित जनजीवन पुन्हा स्थिर झाले आहे.
'पाणी म्हणजे जीवन' म्हणूनच पाण्याच्या प्रत्येक थेंबाची उपलब्धता आणि त्यानंतर काटेकोर वापर महत्वाचा ठरतो. मात्र समस्या विचारात घेऊन गुणात्मक काम करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी कामे होतात; मात्र त्यातून दीर्घकालीन समस्या सुटताना दिसत नाहीत. हीच बाजू विचारात घेऊन युवा मित्र ने महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात काम सुरू केले.
स्थानिक पातळीवर क्षेत्रीय पातळीवर जाऊन पाणी संकटाने ग्रासलेल्या गावांचा अभ्यास केला गेला, गंभीर स्थिती असलेल्या गावांची प्राधान्ऱ्याने निवड केली. ज्यामध्ये उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचा पुनर्विकास हा मुख्य उद्देश समोर ठेवण्यात आला. हवामानातील बदल, मातीची धूप व शेतीवर होणारा परिणाम विचारात घेण्यात आला. त्यामुळे बंधारे, नाला, शेततळ्यांचा पुनर्विकास यावर लक्ष केंद्रित केले गेले. यात साठलेला सुपीक गाळ पुन्हा शेतजमिनीत टाकल्याने जमिनी सुपीक होत गेल्या.
ॲग्रोवन २२.३.२५