पुणे जिल्ह्यात पाणलोटनिहाय १९१ निरीक्षण विहिरी निश्चित केलेल्या आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरींची पाणी (भूजल) पातळी वर्षातून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर अशी चार महिन्यात मोजण्यात येते. दरवर्षी भूजल मूल्यांकन होत असते. पुणे जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये झालेल्या भूजल मूल्यांकनाच्या आधारे पुणे जिल्ह्यात एक लाख ७२ हजार ६३३.८८ हेक्टर मीटर इतके काढण्यायोग्य भूजल उपलब्ध होते. त्यापैकी एक लाख २० हजार २४५.२१ हेक्टर मीटर भूजल काढण्यात आले. सन २०२३-२४ मध्ये झालेल्या भूजल मूल्यांकनानुसार एक लाख ८० हजार ४५९.३३ हेक्टर भूजल काढण्यायोग्य उपलब्ध होते.
दीड फुटाने वाढली पातळी
पावसाळा झाल्यानंतर निरीक्षण विहिरीतील पाण्याची पातळी मोजण्यात आली, त्या वेळी यावर्षी ०.३८ मीटरने (दीड फूट) भूजल पातळी वाढल्याची नोंद झाली. २०२३-२४ मध्ये पुणे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बारामती, इंदापूर आणि पुरंदर या तीन तालुक्यांमध्ये 'अटल भूजल' योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे त्या तालुक्यांमध्ये भूजल पुनर्भरण, जलसंधारणाची कामे झाली आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्या पाण्याचे भूजलात रूपांतर झाले आहे. परिणामी, पाण्याची पातळी वाढली. शिरूर, जुन्नर आणि खेड या तालुक्यांतील काही गावांमध्ये 'जलयुक्त शिवार योजना' राबविल्याने तेथेही पातळी वाढली.
१३१ भूजल स्त्रोत कार्यान्वित
पुणे जिल्ह्यातील गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये बंद अवस्थेतील १६८ जलस्रोतांपैकी डिसेंबरपर्यंत दहा महिन्यांत १३१ स्त्रोत पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात विहिरी, बोअरवेल, नदी, धरण, तलाव, जॅकवेल यांसारखे ८०९ जलस्त्रोत आहेत. काम पूर्ण होऊनही स्त्रोत बंद असल्याने योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
महाराष्ट्र टाइम्स २२/०३/२५