छत्तीसगडमधील चकमकीत ३० नक्षलवादी ठार

Vartapatra    22-Mar-2025
Total Views |

Naxalwad21.03.2025
 
गडचिरोली : छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेर-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर काल सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत ३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. या चकमकीत एक जवान शहीद झाला. जवानांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
छत्तीसगड पोलिसांना बिजापूर-दंतेवाडा (बस्तर) जिल्ह्याच्या सीमाभागातील गंगलूर जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली, यावरून जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी अभियान राबवले. दरम्यान, जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात २६ नक्षलवादी ठार झाले. यात बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला.
 
दुसरी चकमक कांकेर- नारायणपूर (अबुझमाड) जिल्ह्याच्या सीमाभागात उडाली. यात चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले. दोन्ही घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

हिंसाचारात दहा वर्षांत घट
* केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये २९० नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले तर १०९० जणांना अटक करण्यात आली.
* ८८१ जणांनी शरणागती पत्करली. यात नक्षलवाद्यांचे १५ म्होरके ठार झाले. २००४ ते २०१४ या काळात नक्षल हिंसाचाराच्या १६ हजार ४६३ घटना घडल्या.
* २०१४ ते २०२४ या काळात ही संख्या ५३ टक्के कमी झाली. एकूण ७ हजार ७४४ हिंसाचाराच्या घटना होत्या.

"देश नक्षलवादमुक्त करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीत सुरक्षा दलांना आणखी एक यश आले. नक्षलवाद्यांविरोधात मोदी सरकारची कठोर भूमिका आहे. देश पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत नक्षलमुक्त होईल," असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता २१.३.२५