अयोध्येत राम दरबार सिंहासन तयार

Vartapatra    20-Mar-2025
Total Views |
 
Hindu Sanskruti20.03.2025
      
   अयोध्या: येथील श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन केला जाणार असून, त्यासाठी पांढऱ्या संगमरवराचे सिंहासन तयार करण्यात आले आहे. तसेच श्रीराम जन्मभूमी संकुलात चौदा विविध देवदेवतांची आकर्षक मंदिरे बांधली जात आहेत. त्या ठिकाणी शुभमुहूर्तावर मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.
 
      तळमजल्याप्रमाणेच पहिल्या मजल्यावरही सिंहासन बनवण्यात आले आहे. मंदिराच्या गर्भगृहात भव्य कोरीव काम आणि त्याच्यासमोर मंडप बनवला आहे. त्याच्या खांबांवरही अप्रतिम नक्षीकाम करण्यात आले असून, त्यासाठी जयपूरचा गुलाबी दगड वापरण्यात आला आहे, श्रीराम जन्मभूमी संकुलात बांधल्या जात असलेल्या चौदा मूर्तींच्या स्थापनेसाठी ३० एप्रिल (अक्षय तृतीया) आणि प्राणप्रतिष्ठा ५ जून (गंगा दशहरा) ही शुभ तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यावर मंदिर ट्रस्टकडून शिक्कामोर्तब व्हायचे बाकी आहे.
 
३० एप्रिलपूर्वी जयपूरहून मूर्ती येणार 
राजस्थानातील जयपूरमध्ये राम दरबाराच्या सर्व मूर्ती तयार केल्या जात आहेत. त्या ३० एप्रिलपूर्वी अयोध्येत पोहोचतील. राम मंदिराच्या सीमा भिंत परिसरात सहा मंदिरे उभारली जात आहेत. यामध्ये भगवान सूर्य, गणेश, हनुमान, शिव, माता भगवती आणि माता अन्नपूर्णा यांच्या मूर्ती स्थापित केल्या जाणार आहेत. याखेरीज सप्तमंडपात सात मंदिरे बांधली जात आहेत. यामध्ये महर्षी वाल्मिकी, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वशिष्ठ, निषादराज, अहिल्या आणि शबरीच्या मूर्ती स्थापित केल्या जातील.
 
पुढारी १९.३.२५