पुण्यातील संशोधकांना सापडला यादवकालीन शिलालेख
SV 02-Mar-2025
Total Views |
बारामती : काही इतिहासप्रेमींना करमाळा परिसरातील कीर्तेश्वर महादेव मंदिर इथे एक शिलालेख आढळून आला. त्यांनी ती शिलालेखाची माहिती तत्काळ इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांना पाठवली. त्यानंतर त्या शिलालेखाचा उलगडा झाला.
या शिलालेखाचे वाचन पुण्यातील इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे आणि अथर्व पिंगळे यांनी केले आहे. शिलालेख जुन्या मराठी भाषेत असून नागरी लिपीत कोरलेला आहे. त्यात मंदिराच्या बांधकामाची माहिती दिलेली आहे. माहदूगी नामक गुरवाने देवळाची निर्मिती केल्याची माहिती शिलालेखातून मिळते. त्याने दान दिलेल्या रकमेचाही निर्देश शिलालेखात आहे. या शिलालेखाचा काळ शके १२०१ म्हणजेच सन १२७९ असा आहे. तेव्हा महाराष्ट्रावर यादव राजा रामदेवराव यांचे राज्य होते.
यादवकाळात मराठी ही राजभाषा झाल्यामुळे मराठी शिलालेखांचे वैपुल्य दिसून येते. दुधाणे आणि पिंगळे सातत्याने प्राचीन मराठी शिलालेखांचे संशोधन करत असून नुकताच जालना जिल्ह्यातील किनगाव येथील एका अप्रसिद्ध चालुक्यवंशी शासकाचा अकराव्या शतकातील कोरीव लेख त्यांनी उजेडात आणला होता. पुणे आणि शेजारील जिल्ह्यांतील अप्रकाशित मराठी शिलालेखांच्या वाचनावरही त्यांचे काम चालू आहे. शिलालेखाचा शोध लावण्याच्या कामी विनोद खटके व मनोज कुंभार यांची त्यांना मदत झाली.
शिलालेखाचे वाचन
१. स्वस्ती श्री शके १२०१
२. क्रितेस्वरर्चे देउल केलें
३. गुरंवी केलें पथु उ
४. दू माहवूगी ५०
यादवकाळातील समाज धार्मिक असल्याच्या नोंदी तत्कालीन साधनांतून मिळतात. कीर्तेश्वरचा शिलालेख त्याचेच उदाहरण आहे.लोकमत १७.२.२५