भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतले. आज पहाटे ( भारतीय वेळेनुसार) 3.30 च्या सुमारास फ्लोरिडाच्या किनारी त्यांचे सुखरूप आगमन झाले. ९ महिन्यांपेक्षा अधिक काळा अंतराळात घालवून परत आलेल्या या दोघांची ऐतिहासिक अंतराळ मोहीम यशस्वी रित्या पूर्ण झाली. त्यामुळे अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे.या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांनी सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी महिला ठरल्याचा विक्रम नावावर केला आहे. सुनीता विल्यम्स यांनी या मोहिमेत एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर स्पेसवॉक केला आहे. सुनिता आणि बुच हे दोघेही स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतले. अंतराळवीरांचे SpaceX कॅप्सूल बुधवारी (१९ मार्च, २०२५ ) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडल्यानंतर काही तासांनी मेक्सिकोच्या आखातात पॅराशूटद्वारे उतरले. त्यांचं कॅप्सूल समुद्रात उतरताच चारही बाजूंनी डॉल्फिन्सनी गराडा घालत त्यांचं अनोखं स्वागतही केलं.
अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेले सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले. तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर परतले आहेत. पण असं असलं, तरी या काळात संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांना लगेच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही. त्यासाठी त्या दोघांनाही किमान ४५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल, त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं आवश्यक असेल.
सारा नावाच्या विद्यार्थिनींनं सुनिता यांना अंतराळातून पृथ्वीकडं पाहिल्यानंतर कसं वाटतं असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना सुनिता यांनी पृथ्वीवरील खंड आणि देशांचं वर्णन केलं होतं.भारताबद्दल बोलताना त्यांनी भारत आणि पूर्वेकडील भागाचे वर्णन करताना वरून हा भाग रहस्यमय किंवा गूढ वाटतो असं म्हटलं होतं. पण वरून पाहताना कोणत्याही सीमा दिसत नाही आपण सगळे एक असल्याची भावना निर्माण होते, असं सुनिता म्हणाल्या होत्या.सुनिता अंतराळात जाताना बरोबर भगवदगीता घेऊन गेल्या होत्या.त्याबाबत बोलताना सुनिता म्हणाल्या होत्या की, "त्या गोष्टी माझ्यासाठी खास होत्या. माझ्या वडिलांना मला दिलेली ती भेट होती. मीही इतरांसारखीच आहे, हे त्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो," असं सुनिता म्हणाल्या होत्या.