शनिवार, दिनांक १५ मार्च २०२५ रोजी संस्कृती जागरण मंडळाच्या 'सांस्कृतिक वार्तापत्र ' या संघाच्या जागरण पत्रिकेला २४ वर्ष पूर्ण होऊन संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने सांस्कृतिक वार्तापत्राच्या कार्यालयात छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. यात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डी.एल.एड. कॉलेजमध्ये गेली १२ वर्ष इतिहास आणि मानसशास्त्र शिकवणाऱ्या शुभांगी तांबट यांना आमंत्रित केले होते. त्यांनी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानमार्फत यमगरवाडी येथे चालवल्या जाणाऱ्या एकलव्य विद्या संकुलात पूर्ण दोन वर्ष पूर्णवेळ काम केले आहे. त्यांनी तेथील कामाचे अनुभव गप्पांच्या स्वरूपात सांगितले. हा कार्यक्रम चांगलाच रंगला आणि या निमित्ताने सर्वाना एका वेगळ्या कामाबद्दल माहिती मिळाली.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक श्री. मिलिंद शेटे, व्यवस्थापिका सुनीता पेंढारकर, सल्लागार भाऊराव क्षीरसागर आणि कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मिलिंद शेटे यांच्या प्रस्तावनेने झाली. मेघना घांग्रेकर यांनी शुभांगी तांबट यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचा समारोप सुनीता पेंढारकर यांनी केला.