गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात कवंडे येथील जंगलात नक्षल्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव फसला आहे.
कवंडे हे गाव भामरागड तालुक्यातील शेवटचे गाव असून, ते छत्तीसगड सीमेवर आहे. ९ मार्चला गडचिरोली पोलिस दलाने तेथे पोलिस ठाण्याची उभारणी केली. त्यानंतर आज कवंडे येथील पोलिस ठाण्यातील विशेष अभियान पथकाचे जवान परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना पोलिस मदत केंद्रापासून दक्षिणेला शंभर मीटर अंतरावर जंगलातील पायवाटेवर पोलिसांना एक बंदूक आढळली. शेजारच्या जागेत काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला.
त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणाद्वारे त्या जागेची तपासणी केली असता जमिनीत दीड ते दोन फूट खोल स्फोटके दडवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून ती नष्ट केली. यामुळे घातपाताचा नक्षल्यांचा डाव उधळला गेला.
लोकमत १६.३.२५