'इस्त्रो'चा स्पेडेक्स उपग्रह वेगळे करण्याचा प्रयोग यशस्वी!!

Vartapatra    17-Mar-2025
Total Views |
      
Suraksha17.03.2025
 
 
      नवी दिल्ली, ता.१४ (पीटीआय) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) पुन्हा एकदा यशाला गवसणी घातली आहे. "स्पेडेक्स' उपग्रह वेगळे करण्याचा (अनडॉकिंग किंवा डिडॉकिंग) प्रयोग यशस्वी झाला असल्याचे 'इस्त्रो'ने गुरुवारी (ता.१३) जाहीर केले. यामुळे चंद्राचे संशोधन, मानवी अंतराळ मोहीम आणि स्वतःचे अंतराळ स्थानक बांधणे, अशा भारताच्या भावी काळातील अंतराळ मोहिमांसाठी मार्ग खुला झाला आहे.
 
      अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याच्या प्रक्रियेला 'डॉकिंग' आणि वेगळे करण्याच्या प्रक्रियेला 'अनडॉकिंग' म्हणतात. केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी काल 'एक्स' वरील एका पोस्टमध्ये उपग्रहांचे यशस्वी 'डी-डॉकिंग' झाल्याचे जाहीर केले.
 
      'इस्रो'ने गेल्या वर्षी ३० डिसेंबरला 'स्पेडेक्स'चे प्रक्षेपण केले. 'डॉकिंग' प्रयोगासाठी 'एसडीएक्स ०१' आणि 'एसडीएक्स ०२' हे दोन उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केले होते. 'इस्रो'ने १६ जानेवारी दोन उपग्रह 'डॉक' करण्यात यश मिळविले होते. त्यानंतर काल (गुरुवारी) सकाळी नऊ वाजून २० मिनिटांनी 'स्पेडेक्स' उपग्रहांचे 'अनडॉकिंग' करण्याची महत्त्वाचा प्रयोग पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केला. उपग्रहांचे 'अनडॉकिंग' ४६० किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत आणि ४५ अंशांच्या कोनात झाले. दोन्ही उपग्रह आता स्वतंत्रपणे कक्षेत फिरत आहेत आणि त्यांचे कार्य सुरळीत सुरू, असेही त्यात म्हटले आहे. वर्तुळाकार कक्षेत 'डॉकिंग' आणि 'अनडॉकिंग' करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्षमता 'इस्रो'ने यशस्वीरीत्या प्रदर्शित केल्या आहेत.
 
 
सकाळ १५.३.२४