भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या नांदघूर येथे महाराष्ट्रातील पहिला बांबूच्या शेतीचा आणि बांबू पर्यटन प्रकल्प उदयास आला आहे. उच्चशिक्षित महिला शेतकरी अनुराधा काशिद यांनी पती राहुल काशिद यांच्या मदतीने बांबूचे उत्पादन, लागवड, व्यवस्थापन आणि एकात्मिक प्रक्रिया उद्योग करण्यासाठी दहा एकर क्षेत्रात 'द बांबू सेतू' नावाचा नवीन प्रकल्प सुरू केला आहे. 'द बांबू सेतू' हे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी देत आहे. सध्या 'द बांबू सेतू' मध्ये २० हजार बांबू असून, ९ हजार तोडीला आले आहेत. नवीन ३ लाख रोपे तयार केली आहेत.
गेल्या काही वर्षांत नांदघूर गाव एक 'स्मार्ट बांबू व्हिलेज' म्हणून विकसित करण्याचे ध्येय अनुराधा काशिद यांचे आहे. महिला कृषी उद्योजकांनी बांबूसारखे प्रकल्प हाती घेतले, तर भारताच्या कृषी क्षेत्राला उज्वल भविष्य मिळेल असा विश्वास अनुराधा काशिद व्यक्त करीत आहेत. 'द बांबू सेतू' हा केवळ एक व्यावसायिक उपक्रम नाही, तर हा एक पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाकडे नेणारा उपक्रम आहे. तसेच, 'शेतकरी ते ग्राहक'चा सेतू म्हणजेच 'द बांबू सेतू' आहे. निसर्गसंवर्धन, पर्यटन आणि बांधकामात बांबूच्या क्षमतेचा उपयोग करून त्याचा वापर अधिक वाढवण्याचा काशिद यांचा मानस आहे.
सकाळ, २८.११.२०२४