मावळ, पुणे - गावात दहावीपर्यंत शाळा. गाव महामार्गापासून जवळ असले तरी मुलींना प्रवासासाठी ताटकळत उभे राहावे लागते. बचत गटातील महिला एकत्र आल्या आणि जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठविला. बचत गटातील महिलांची हाक जिल्हा परिषदेने ऐकली आणि तत्काळ वाहन प्रशिक्षणासाठी तरतूद केली. पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर मावळमधील बेबडहोळ गावातील वीस महिलांना अनुदान देण्याचे निश्चित केले आणि महिलांचे प्रजासत्ताक दिनापासून प्रशिक्षण सुरू झाले.महिलांच्या गरजा ओळखून जिल्हा परिषदेने या प्रशिक्षण वर्गासाठी ७५ टक्के अनुदान देण्याचे ठरवले आणि त्याची अंमलबजावणी देखील केली आहे. याबाबत बेबडहोळच्या प्राजक्ता घारे म्हणाल्या, "बहुतांश महिलांच्या घरी वाहने उपलब्ध आहेत. मात्र, शिकवणार कोण ? महिला म्हणून थोडी अडवणूक होतेच. मुलींना शाळेत सोडण्यासाठी, बचत गटात उत्पादित केलेले पदार्थ, वस्तू विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी अडचण येत होती. आम्ही उत्पादित केलेल्या गोष्टींची विक्रीच झाली नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. आम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून आम्ही जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठवला होता, तो त्यांना आवडला, आमचा प्रश्न त्यांना समजला आणि अनुदान देण्याचे ठरवले."
जिल्हा परिषदेकडून प्रायोगिक तत्त्वावर मावळातील २० महिलांना प्रशिक्षण
प्रजासत्ताक दिनापासून बेबडहोळ गावातील महिलांना गावातच वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास नुकतीच सुरुवात झाली. जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांचे याकामात सहकार्य लाभले.
सकाळ ३०.१.२५