सांबाराची कथा

SV    23-Jan-2025
Total Views |
 
 छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी (एकोजी) तंजावरचं राज्य सांभाळत होते. त्यांचे निधन झाल्यावर त्यांचे  पुत्र शाहुजी पहिले सत्तेवर आले. तंजावरच्या इतर राजांप्रमाणे लेखन, काव्य, कला यामध्ये त्यांना भरपूर रस होता. ते उत्तम स्वयंपाक करायचे असंही सांगितलं जातं.
प्रसिद्ध कथेनुसार एके दिवशी छत्रपती संभाजी महाराज तंजावरला गेले होते. मात्र शाहुजी महाराजांच्या मुदपाकखान्यात त्या दिवशी आमटीमध्ये घालायला कोकमं नव्हती. तेव्हा कुणीतरी त्यांना 'कोकमाऐवजी चिंच घालून पाहू', असं सुचवलं आणि त्याप्रमाणे चिंच घातलेली आमटी तयार करण्यात आली.
संभाजी महाराजांचा आदर करण्यासाठी त्याला संभाजी+आहार (संभाजी महाराजांचा आहार) अशा अर्थाने सांभार असं नाव देण्यात आलं. हीच आमटी पुढे सर्वत्र वेगवेगळ्या घटकांसह बदलत बदलत दक्षिण भारत मग भारतभर पसरली आणि सांबार नावाने आज प्यायली जाते. अशी सांबाराच्या जन्माची साधारण गोष्ट सांगितली जाते.
दक्षिण भारतातले ख्यातनाम अन्न-इतिहासकार आणि आहारतज्ज्ञ के. टी. आचार्य यांनीही या कुळकथेला दुजोरा दिला होता. त्यामुळे सांबार पदार्थ तिथूनच तयार झाला असावा अशी सर्वमान्य समजूत आहे.
इडली सांबार, वडा सांबार हे पदार्थ जगभर लोकप्रिय आहेत.
कोणतेही सांबार करताना मोहोरी, मेथी दाणे, सुखी लाल मिरची,कढीपत्ता घालुन खमंग फोडणी करावी. तूर डाळ, मुगाची डाळ, मसुराची डाळ या वेगवेगळ्या प्रमाणात घेतात. डाळ मऊसूत शिजवून घ्यायची म्हणजे ती छान एकजीव होते. चिंचेचा कोळ करुन घ्यावा. आवडतील त्या भाज्या मध्यम आकारात चिरुन घ्याव्या म्हणजे छान शिजतात.
आंध्र प्रदेशचे सांबार-
शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळा, कांदा, टोमॅटो एवढ्याच भाज्या असतात. गुंटूरच्या मिरचीचे तिखट वापरल्यामुळे तिखट रंग येतो.
केरळी सांबार-
तुमच्या आवडीनुसार तुम्ही बीटरूट, गाजर, बटाटे, भोपळी मिरची, शेवग्याच्या शेंगा, वांगी अशा कोणत्याही भाज्यांचे मिश्रण वापरू शकता. या सांबारात किसलेले नारळ एक अनोखी चव आणि पोत देते.
कर्नाटकी सांबार-
बटाटे, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा,पावट्याच्या शेंगा या भाज्या मुख्यत: असतात. भेंडी, खीरा, गाजर याही भाज्या घालतात. कांदा-लसूण अजिबात नसते. यातही नारळाचा आणि ताज्या मसाल्याचा वापर करतात.
आंतरजालावरून