प्राथमिक विद्यामंदीर, मांडा-टिटवाळा. पो. मांडा, ता. कल्याण, जि. ठाणे.

Vartapatra    16-Jun-2021
Total Views |

अशी असावी मराठी शाळा - माझी कल्पना

अशी असावी मराठी शाळा,

घडवी विद्यार्थ्यांचा भक्कम पाया

संस्काराची शिदोरी देऊन

देई उज्वल भविष्य देशाला

‘शाळा’. शाळा या एका शब्दापाशी खरं तर एक अनामिक ओढ आहे. जिव्हाळा, आपुलकी, आदर आहे. आपलं एक अख्खं विश्वच या एका ठिकाणी सामावलेलं असतं आणि म्हणूनच शाळा आपल्याला पुढील आयुष्यात या खुल्या जगात खंबीरपणे नेतृत्व करण्याची, सुखी क्षणांचा आनंद घेण्याची, प्रामाणिकपणे जगण्याची, आत्मविश्‍वासाने समाजात वावरण्याची ताकद देते. नेहमीच समाजाच्या जडणघडणीत शाळेचाच मोठा हातभार असतो. म्हणूनच जिथे देशाच्या भावी नागरिकाचा पाया रचला जातो, अशा शाळा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत शाळा, दर्जेदार शिक्षण, शाळांची माध्यमे, शाळांचे बोर्ड (सी.बी.एस्.सी., आय.सी.एस्.सी., स्टेट बोर्ड) शाळांमधील भौतिक सुविधा यांवर बराच उहापोह सुरू आहे आणि त्यांच्यात स्पर्धाही सुरू आहे. अनेक शाळांचा लौकिक पाहायला व ऐकायला मिळत आहे. तेव्हा या सर्व मिश्रणात शाळा मराठी असेल तर ती कशी असावी अशी कल्पना केली. स्वत:शी सुसंवाद साधला आणि आपोआप अनेक प्रश्‍नांची उत्तरे उलगडू लागली. कल्पनेत अगदी सुगरणीच्या खोप्याची एक एक वीण घट्ट बसावी आणि निसर्गाची किमया साकारावी किंबहुना, तसेच ‘कशी असावी मराठी शाळा माझ्या कल्पनेत’ अशी अबोलपणे लेखणी फिरू लागली.

खरं पाहाता, समाजातील बराच पालकवर्ग भौतिक सुविधांची रेलचेल असलेल्या इतर माध्यमांच्या शाळांकडे वळत आहे. म्हणजे खूप पैसे भरले की, पाल्याच्या शिक्षणाबाबत आपण निश्‍चिंत अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा शाळांमधून 20-25 पुस्तकांचे ओझे घेऊन लहान मुले ए.सी. वर्गात बसतात. शाळेतून नाश्त्यापासून जेवणापर्यंत खाद्यपदार्थ पुरवले जातात. प्रोजेक्टर, कॉम्प्युटरवर सर्व शिक्षण त्यामुळे मुले विद्यार्थी-शिक्षक आंतरक्रिया, सुसंवाद कमी, मित्र-मैत्रिणींबरोबर विचारांची देवाणघेवाण नाही. सहकार्य भावना नाही त्यामुळे मुले एकलकोंडी व परावलंबी होत आहेत. या शिक्षणप्रक्रियेतून यंत्रवत मेंदू निर्माण होताना दिसत आहेत. केवळ साचेबद्ध ज्ञान घेऊन सांख्यिकी गुण मिळवलेले विद्यार्थी पाहिले की, लक्षात येते की, या पिढीतील संवेदनशीलता, सुसंस्कृतपणा, स्वावलंबन, संस्कार असे आणखी बरेचसे गुण कुठे हरवून गेलेत? ही बाब खरं तर खूपच गंभीर आहे. त्यामुळे समाज कोणत्या दिशेने जात आहे, असा प्रश्‍नच आहे. भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहेच. परंतु असे ठासून सांगावेसे वाटते की, जर शाळा मराठी असेल तर ती अशी असावी की जी विद्यार्थ्याला ज्ञानाच्या भांडारासोबत सुसंस्कारांची भलीमोठी शिदोरी देऊन विविध सकारात्मक अनुुभवाचा ठेवा देत एक सक्षम नागरिक देशाच्या हाती सुपूर्त करेल. संस्कारक्षम शिक्षण ही बाब विशेष नमूद करावीशी वाटते आणि मराठी माध्यमांच्या शाळेतून ही गोष्ट नक्कीच साध्य होऊ शकते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत संस्कारक्षम, आत्मविश्‍वासपूर्ण शिक्षण देण्याचे शिवधनुष्य पेलणारी मराठी शाळा असावी. खरं तर वाचन-लेखन शिकवण्याचे काम सर्वच शाळांमधून होत असते. मात्र ज्ञानरचनापद्धतीवर प्रत्यक्ष अनुभूती, कृती-उपक्रम-कार्यक्रम यांवर आधारित हसतखेळत, आनंददायी शिक्षण देणारी शाळा असावी.

शाळा जरी मराठी असली तरी तेथे भाषेचा भेदभाव नसावा. इंग्लिश, हिंदी इतर विषयाचे ज्ञानही तेथे अभ्यासपूर्णच दिले जावे. प्रत्येक भाषा शिक्षणाला तिथे न्याय दिला जावा. विद्यार्थ्यांकडे प्रत्येक विषयाचे भाषा शिक्षणाचे भरपूर ज्ञान असावे. त्याकरिता मराठी भाषेइतकाच आनंद मुलांना इतर भाषांचे शिक्षण घेतानाही वाटावा. मराठी शाळेतील शिक्षक ध्येयवेडे असावेत जे साचेबद्ध शिक्षणाच्या बंधनात न अडकता शिक्षणाच्या विविध वाटा चोखाळताना दिसावेत. शिक्षक-मुख्याध्यापक-पालक-कर्मचारी यांमध्ये सौहार्दाचे नाते असावे. शिक्षणात होणारे बदल स्वीकारून स्वत:ला अद्ययावत ठेवणारे, तसेच तंत्रस्नेही शिक्षक व मुख्याध्यापक असावेत. आणि मग याच ऋणानुबंधाच्या सावलीत देशाचे वटवृक्ष वाढावेत व बहरावेत. याक्षणी प्रार्थनेच्या ओळी स्मरतात,

तू बुद्धी दे, तू तेज दे,

नवचेतना विश्‍वास दे,

जे सत्य, सुंदर सर्वथा,

आजन्म त्याचा ध्यास दे

अशा अनेक मराठी शाळांमधून तो विश्‍वास, बुद्धी, नवचेतना व सत्याचा ध्यास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा.

शाळेचे माध्यम मराठी असले तरीही तेथे बंधुतेचे, समतेचे, संवादाचे, सहकार्याचे बाळकडू दिले जावे. तेथे भारतातील विविध धर्म जाती संस्कृतीची परिभाषा मुलांना कळावी; एकोपा, बंधुतेचे, समानतेचे महत्त्व मुलांना कळावे. त्याकरिता शाळांमधून सर्व धर्मांचे सण साजरे व्हावेत. विविध धार्मिक स्थळे, कलाविष्कारांची ओळख मुलांना व्हावी. त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण व्हावा. सामाजिक बांधिलकी जपत शाळेने विविध कार्यक्रमांतून अशी संधी पालक- शिक्षक-विद्यार्थी यांना उपलब्ध करून द्यावी. ज्यामुळे समाजात शाळेची एक ओळख निर्माण व्हावी. ती शाळा आदर्श ठरावी.

मराठी शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना वाचनाचे दालन उघडून द्यावे की ते विद्यार्थी वाचनसंपन्न करावेत. खेळाच्या विविध संधी मुलांना द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, भावनिक आरोग्याची काळजी शाळेने घ्यावी. प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती समजून घेऊन त्याला शालेय प्रवाहात आणावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पोषक वातावरण निर्माण करावे. शिक्षण देणारी शाळा नक्कीच त्या बालकाचे आयुष्य उज्ज्वल करेल.

शाळेमधून स्वच्छता, वैज्ञानिक दृष्टीकोन, स्त्री-पुरुष समानता, श्रमदान, संवेदनशीलता अशा मूल्यांची रूजवण व्हावी. त्यातून समाजहित जपणारे विद्यार्थी त्या शाळेचे अभिमान ठरतील.

शाळांकडे समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले जाते. मात्र समाजात मराठी शाळांचे आस्तित्व खरे धोक्यातच आहे. परंतु, जे दर्जेदार शिक्षण मराठी शाळा देऊ शकतात ते इतर नक्कीच नाही देऊ शकत. हळूहळू अनुभवातून समाजाला समाजहित लक्षात येईल. कारण भारतीय संस्कृती संस्कार संपूर्ण जगाला दिशा देण्याचे कार्य करत आहे. तेव्हा अशा मराठी शाळा म्हणजे मराठी मातृभाषेतील शाळा या विद्यार्थी घडविण्याचे, समाज जागृतीचे कार्य करून विकासाचा पाया भक्कम करतील व राष्ट्रहितार्थ कार्य करतील.

शैक्षणिक गुणवत्तबरोबर भौतिक सुविधांचाही विचार होणे गरजेचे आहे. शालेय इमारत शांत व आनंददायी परिसरात असावी. ती योग्य आकारात असून भरपूर प्रकाश, वारा येणारी स्वच्छ असावी. काही आपत्तीकाळात विद्यार्थ्यांना विनाअडथळा शाळेतून बाहेर पडता यावे. शाळेच्या भिंती बोलक्या असाव्यात. नकाशे, सुविचार, दिनविशेष सहज नजरेस पडावेत. शाळा निसर्गाशी पर्यावरणाशी मैत्री करणारी असावी. विद्यार्थ्यांना निरीक्षणास वक्तृत्वास, प्रयोग करण्यास अभिव्यक्त होण्यास वाव मिळावा. याकरिता सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण, संगणक कक्ष, डिजीटल वर्ग असावेत. अध्ययन-अध्यापनात वेळोवेळी त्याचा वापर व्हावा. विद्यार्थी संख्येनुसार पाण्याची व्यवस्था, शौचालय व्यवस्था असावी. शाळेत विविध शैक्षणिक असावे. शालेय सहल, स्नेहसंमेलन, स्पर्धा, स्पर्धापरीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम यांत जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी करून घ्यावेत. विशेष विद्यार्थ्यांकरिता विशेष सुविधा असाव्यात. ज्यामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहाणार नाही. शासनाकडून मिळणार्‍या सर्व सुविधा शाळेने सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करावे आणि सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणावे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की,

शाळा हे ज्ञानाचे मंदिर,

करू संस्काराचे औक्षण,

बालकाचे आनंदी ज्ञानमय जीवन

हेच ध्येय गुणवत्तापूर्ण शिक्षण

असेच गुणवत्तापूर्ण शिक्षण मराठी शाळांमधून दिले जावे. असे निरंतर जीवनोपयोगी शिक्षण देणारी शाळा विद्यार्थी सक्षम बनवते. समाजाला अज्ञानातून-ज्ञानाकडे, अंधारातून-प्रकाशाकडे नेते. सामाजिक बांधिलकी निर्माण करते. तेव्हाच खरं तर शाळा योग्य दिशेने वाटचाल करते. अशी मराठी शाळा अखंडपणे चालावी नेहमी प्रगतिशील असावी. त्याकरिता केवळ मराठी शाळा म्हणून ईश्‍वराकडे प्रार्थना करताना एका पवित्र गीताच्या ओळी स्मरणात येतात,

स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त,

ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त

निर्भयता जागावी हीच प्रार्थना

शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना

- मनस्वी मंगेश घंगाळे,

प्राथमिक विद्यालय,

विवेकानंद संकूल, सानपाडा.